चेन्नई D Gukesh Coach Vishnu Prasanna : डी गुकेश यानं वयाच्या 17 व्या वर्षी मंगळवारी कॅनडात ग्रँड मास्टर बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकल्यानं त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. याप्रकरणी डी गुकेशचे प्रशिक्षक विष्णू प्रसन्ना यांनीही त्याच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. ईटीव्ही भारतशी बोलताना त्यांनी आनंद व्यक्त केला. "डी गुकेशनं वयाच्या 17 व्या वर्षी मोठी कामगिरी केली आहे, त्यामुळे मला खूप आनंद झाला. गुकेशनं एक नवीन विक्रम केला आणि जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप चॅलेंजर बनणारा सर्वात तरुण खेळाडू बनला. मी त्याच्या भावी वाटचालीसाठी खूप आनंदी आणि उत्साहित आहे,” असं प्रशिक्षक प्रसन्ना यांनी स्पष्ट केलं. "गुकेशचा आगामी सामना चीनच्या ग्रँड मास्टर डिंग लिरेन याच्याशी होणार आहे. हा सामना गुकेशला आव्हान असणार आहे," असही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
विश्वनाथन आनंद यांच्यानंतर गुकेश हा दुसरा खेळाडू :भारताचा ग्रँड मास्टर बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद हा कँडिडेट्स टूर्नामेंट जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला होता. त्यानंतर डी गुकेश हा बुद्धिबळपटू कँडिडेट्स टूर्नामेंट जिंकणारा दुसरा भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे. विशेष म्हणजे डी गुकेश यानं 14 सामने खेळून 9 गुण मिळवले आहेत. "डी गुकेशचा या वर्षाच्या शेवटी चीनच्या ग्रँड मास्टर डिंग लिरेनशी सामना होणार आहे. मात्र हा सामना डी गुकेशसाठी आव्हानात्मक असेल," असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.