पालघर Wrestler Sainath Pardhi News : जॉर्डनमधील अमान येथे सुरू असलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत ग्रीक रोमन विभागातून भारतीय संघाच्या साईनाथ पारधी या आदिवासी युवकानं 51 किलो वजन गटात कांस्यपदक पटकावलं. कझाकिस्तानच्या येरासी मुस्सान या पैलवानाला तीन विरुद्ध एक गुणांनी चितपट करून त्यानं हे यश संपादन केलंय. साईनाथ पारधी हा पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गोऱ्हे येथील रहिवासी आहे. सुरुवातीला त्यानं भाईंदर येथील गणेश आखाड्यातून कुस्तीचे धडे गिरवले. कुस्ती प्रशिक्षक सदानंद पाटील यांनी साईनाथला मोलाची मदत केली.
‘मिशन ऑलिम्पिक’चा फायदा : ‘जाणता राजा कुस्ती केंद्रा’चे प्रमुख पैलवान संदीपान भोंडवे यांनी महाराष्ट्रातील कुस्तीगिरांनी ऑलिम्पिक पदक मिळवावं या उद्देशानं ‘मिशन ऑलिम्पिक’ ही योजना सुरू केली. या योजनेत कुस्तीगिरांची निवड करण्यासाठी जानेवारी 2021 मध्ये जाणता राजा कुस्ती केंद्रावर महाराष्ट्रातील पंधरा वर्षांखालील कुस्तीगिरांच्या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आलं होते. या चाचणीत महाराष्ट्रातील 166 पैलवानांनी सहभाग घेतला. त्यातून ‘मिशन ऑलिम्पिक’साठी दहा पैलवानांची निवड करण्यात आली. त्यात साईनाथचाही सहभाग होता.
भोंडवे यांच्या सल्ल्यानुसार खेळात बदल : निवड झालेल्या कुस्तीगिरांची राहण्याची सोय, भोजन, खुराक आणि प्रशिक्षणाचा सर्व खर्च पैलवान संदीप भोंडवे अध्यक्ष असलेले ड्रीम फाउंडेशन जाणता राजा कुस्ती केंद्र करत आहे. साईनाथ पारधी याची 42 किलो फ्रीस्टाइल विभागात ‘मिशन ऑलिम्पिक’साठी निवड करण्यात आली होती. साईनाथचा दहा ते बारा महिन्यांचा कुस्तीचा सराव पाहून त्याचे वस्ताद संदीप भोंडवे यांनी त्याला ग्रीको रोमन प्रकारात खेळण्याचा सल्ला दिला. त्यानंतर साईनाथचा ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेचा सराव सुरू झाला.