पुणे MPL 2024 : पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर झालेल्या महाराष्ट्र प्रिमीयर लीगच्या अंतिम सामन्यात रत्नागिरी जेट्स संघानं ईगल नाशिक टायटन्स संघाचा 24 धावांनी पराभव केला. या विजयासह रत्नागिरीनं सलग दुसऱ्या वर्षी एमपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत सुमारे 30 हजार पुणेकरांनी आपली उपस्थिती दर्शवली होती. या सामन्यात रत्नागिरी जेट्स संघानं ईगल नाशिक टायटन्सवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. स्पर्धेतील विजेत्या रत्नागिरी जेट्स संघाला चषक व 50 लाख रुपये, तर उपविजेत्या ईगल नाशिक टायटन्स संघाला चषकासह 25 लाख रुपये अशी पारितोषिकं देण्यात आली.
प्रथम फलंदाजी करताना रत्नागिरीची समाधानकारक मजल : या सामन्यात ईगल नाशिक टायटन्स संघानं रत्नागिरी जेट्स संघाला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. मात्र या संधीचा फायदा घेण्यात रत्नागिरीचे फलंदाज अपयशी ठरले. कर्णधार अझीम काझी (8), दिव्यांग हिंगणेकर (4) आणि सत्यजीत बच्छाव (5) हे झटपट बाद झालं. त्यामुळं रत्नागिरीचा संघ अडचणीत सापडला. यानंतर रत्नागिरीनं पहिल्यांदाच सत्यजीतला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरविलं. पण हा बदल अयशस्वी ठरला. नाशिकच्या समाधान पांगरेनं सत्यजीतला झेल बाद केलं. त्यानंतर आक्रमक फटके मारण्याच्या प्रयत्नात धीरज फटांगरे देखील 27 धावांवर बाद झाला. मात्र यानंतर किरण चोरमले व अभिषेक पवार यांनी पाचव्या विकेटसाठी 28 चेंडूत 44 धावांची भागीदारी करुन संघाचा डाव सावरला. किरण चोरमलेनं 23 चेंडूत 35 धावांची संयमी खेळी केली. आपल्या खेळीत त्यानं 3 चौकार व 2 षटकार लगावले. त्याला अभिषेक पवारनं 22 चेंडूत 3 षटकारांसह 28 धावांची छोटेखानी खेळी करुन उत्तम साथ दिली. हे दोघंही आक्रमक फटकेबाजीच्या प्रयत्नात बाद झाल्यानंतर निखिल नाईकनं 25 चेंडूत 3 चौकार व 1 षटकाराच्या मदतीनं नाबाद 36 धावांची खेळी करुन संघाला 160 धावांचं आव्हान उभं करुन दिलं.