मुंबई Longest Test Match : आधुनिक क्रिकेटच्या युगात अनेक खेळाडू कसोटी क्रिकेट खेळण्यास टाळाटाळ करतात. पाच दिवस चालणाऱ्या या फॉरमॅटमध्ये खेळाडूंची खरी 'कसोटी' लागते, मग तो फलंदाज असो की गोलंदाज. पण एक काळ असा होता जेव्हा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लांब कसोटी सामना खेळला गेला आणि खेळाडू 12 दिवस खेळले. हा सामना 85 वर्षांपूर्वी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला होता. जेव्हा दर्शक सामन्याचा निकाल पाहण्यासाठी आतुर झाले होते.
इंग्लंडनं केला होता दक्षिण आफ्रिकेचा दौरा : इंग्लंडचा क्रिकेट संघ 85 वर्षांपूर्वी म्हणजेच 1939 मध्ये 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. या मालिकेतील अखेरच्या सामन्यानं क्रिकेटच्या इतिहासात अनोखा विक्रम केला. हा सामना 3 मार्चला सुरु झाला आणि 14 मार्चपर्यंत चालला. पावसामुळं 11 आणि 12 तारखेला सामना होऊ शकला नाही. 14 मार्चच्या संध्याकाळी इंग्लंड विजयापासून 42 धावा दूर होता, पण पंचांनी सामना अनिर्णित घोषित केला. कारण त्या दिवशी इंग्लंडच्या संघाला केपटाऊनला पोहोचण्यासाठी दोन दिवसांचा प्रवास करावा लागला होता, जिथं त्यांचं जहाज परतीच्या प्रवासाची वाट पाहत होते. त्यामुळं सामना अनिर्णित घोषित करण्यात आला. या सामन्यात एकूण 680 षटकं टाकण्यात आली होती.
सामन्यात झाले होते 1981 रन : वास्तविक या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार अनल मेलवेलनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यजमान संघानं 2 दिवस भरपूर धावा केल्या आणि तिसऱ्या दिवशी विश्रांती घेतली. चौथ्या दिवसाच्या खेळात दक्षिण आफ्रिकेचा संघ 530 धावा करुन सर्वबाद झाला. 2 दिवस फलंदाजी केल्यानंतर इंग्लंडनं पहिल्या डावात 316 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या डावात पुन्हा धावा केल्या आणि धावफलकावर 481 धावा लावल्या. त्यानंतर इंग्लंडसमोर 696 धावांचं लक्ष्य होते. इंग्लंडच्या वतीनं बिल एडरिचनं द्विशतक झळकावत संघाला विजयाच्या जवळ आणलं. इंग्लंडनं 654 धावा केल्या होत्या.