कोल्हापूर World Wrestling Championship : घरची परिस्थिती हलाखीची, कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी आई-वडिल शेती करायचे. पण मुलगीची जिद्द मोठी. ही जिद्दीची गोष्ट आहे कोल्हापूरच्या रोहिणी खानदेव देवबा या युवतीची. कोल्हापुरातील पट्टणकोडोली हे तिचं गाव. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तिनं आशियाई वर्ल्ड रेसलिंग स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. जाणून घ्या या तरुणीची यशोगाथा.
दागिने गहाण ठेवून पैशाची जमवाजमव :वडिलांना लहानपणापासूनच कुस्तीची आवड. गावातच वडिलांनी कुस्तीचे धडे घेतले. मात्र, जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेच्या पुढे वडिलांचा कुस्ती प्रवास काही गेला नाही. बेताची आर्थिक परिस्थिती असल्यामुळं वडिलांचं कुस्ती प्रेम बहरण्याआधीच संपलं. मात्र, आपल्या मुलीला वयाच्या नवव्या वर्षापासून कुस्तीचे बाळकडू देत आपलं अपूर्ण राहिलेलं स्वप्न मुलगी पूर्ण करणार या विश्वासानं आई आणि वडिलांनी मुलीला पाठबळ दिलं. आईनं तर अंगावरचे दागिने गहाण ठेवून मुलीच्या खुराकासाठी पैशाची जमवाजमव केली. गरिबीवर मात करत मुलीनंही अटकेपार झेंडा रोवला. थायलंड येथील नुकत्याच झालेल्या आशियाई वर्ल्ड रेसलिंग स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घालून या मुलीनं आपल्या वडिलांसह आईचे पांग फेडलेत. ध्येय, चिकाटी आणि स्वप्नाला कष्टाची जोड मिळाली की सारं काही शक्य आहे हेच रोहिणीच्या कामगिरीतून सिद्ध होतं.
33 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई :कुस्तीची पंढरी असलेल्या कोल्हापुरात महिला कुस्तीलाही चांगले दिवस येत आहेत. जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर कोल्हापूरच्या अनेक महिला कुस्तीपटूंनी चमकदार कामगिरी करत जिल्ह्यासह देशाचं नाव उंचावलं आहे. कोल्हापुरातील पट्टणकडोली येथील रोहिणी खानदेव देवबा या महिला कुस्तीपटूनं 17 जुलै रोजी थायलंड येथे झालेल्या आशियाई वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताचं नेतृत्व करत 33 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली. रोहिणीने जपान, मंगोलिया, कजाकिस्तान, उझबेकिस्तान देशाच्या मल्लांवर मात करत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. कुस्ती प्रशिक्षक बाजीराव बाणदार यांनी रोहिणीला वयाच्या नवव्या वर्षापासून कुस्तीचं प्रशिक्षण दिलं तर 3 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर रोहिणीची राजर्षी शाहू निवासी क्रीडा प्रशाला, शिंगणापूर येथे निवड झाली. सध्या रोहिणी एनआयएस कोच संदीप पाटील यांच्या दोनवडे येथील अकॅडमीत प्रशिक्षण घेत आहे.