जतीन परांजपे यांची प्रतिक्रिया मुंबईCricket coaching course : 'खेलो मोर' स्पोर्ट्स या डिजिटल प्लॅटफॉर्मनं मेलबोर्न क्रिकेट अकादमीसोबत केलेल्या भागीदारीमुळं क्रिकेट खेळातील अनेक अर्धव्यावसायिक गोष्टींना बळकटी मिळणार आहे. 'खेलो मोर' तसंच मेलबोर्न क्रिकेट अकादमीसोबत भागीदारीची घोषणा आज मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथे करण्यात आली. "या भागीदारीमुळं भारत, ऑस्ट्रेलियातील क्रिकेट संस्कृतीचा मिलाप होणार आहे. त्यामुळं नवोदित क्रिकेटपटू, प्रशिक्षकांनाही नवनवीन गोष्टी शिकता येतील," असा विश्वास क्रिकेट विक्टोरियाचे सीईओ निक कमिन्स यांनी व्यक्त केला.
क्रिकेट प्रशिक्षणातील नवा अध्याय : "मेलबर्न क्रिकेट अकादमी तसंच 'खेलो मोर' स्पोर्ट्सच्या वतीनं सुरू करण्यात येणाऱ्या क्रिकेट प्रशिक्षण कार्यक्रमामुळं क्रिकेट विश्वात प्रशिक्षणाचा एक नवा अध्याय सुरू होणार आहे. भारतातील खेळ पट्ट्या, हवामान, मानसिकता यांच्याशी ऑस्ट्रेलियातील खेळाडूंची जिद्द, चिकाटी, व्यावसायिकता, आक्रमकता यांची सांगड घातली जाणार आहे. यामुळं नवोदित क्रिकेटपटूंना त्याचा निश्चितच उपयोग करता येईल. तसंच अन्य खेळाडू, प्रशिक्षकांना यातून खूप काही शिकता येईल," असं जतीन परांजपे यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
कसा असेल प्रशिक्षण कार्यक्रम? :मेलबोर्न क्रिकेट अकादमीकडून क्रिकेट प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम हा तीन टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे. प्रत्येक टप्पा हा बारा आठवड्यांचा असणार आहे. यामध्ये खेळाचे कौशल्य, माहिती, आत्मविश्वास याबरोबरच खेळाचा दर्जा, गुणवत्ता वाढीवर लक्ष दिलं जाणार आहे. या प्रशिक्षित खेळाडूंना प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती परांजपे यांनी दिली.
शाळेतील विद्यार्थ्यांसोबतच प्रशिक्षकांनाही प्रशिक्षण :जतीन परांजपे म्हणाले की, शाळेतील विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमामध्ये सहभागी करून घेण्याचा आमचा विचार आहे. खेळाची गुणवत्ता वाढावी, अधिकाधिक गुणवान, दर्जेदार खेळाडू तयार व्हावे, यासाठी आमचा उपक्रम असणार आहे. यासाठी आम्ही प्रमाणपत्र अभ्यासक्रम तयार केला असून प्रशिक्षकांसाठीही प्रमाणपत्र अभ्यासक्रम तयार करण्यात येत आहे. त्यामुळं हजारो प्रशिक्षकांना या प्रमाणपत्राचा निश्चितच उपयोग होईल. भारतातील क्रिकेटचं भविष्य अधिक उज्वल होईल, असा विश्वास यावेळी परांजपे यांनी व्यक्त केला आहे. हा अभ्यासक्रम क्रिकेट विक्टोरिया यांनी तयार केला असून शेन वॉर्न, ग्लेन मॅक्सवेल, मेग लनिंग यासारख्या खेळाडूंचे मार्गदर्शन क्रिकेटपटूंना मिळणार आहे.
पांड्याला ट्रोल करणं वाईट :यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वच संघ चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. मात्र, त्यामध्येही पॅट कमिन्स यांच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबाद संघ निश्चित काहीतरी करेल, अशी शक्यता मला वाटते, असं मत जतीन परांजपे यांनी व्यक्त केलं. मुंबई इंडियन्सच्या कामगिरीबद्दल बोलताना जतीन म्हणाले, मुंबई इंडियन्सचा संघ सुरुवात स्लो पद्धतीनं करतो. यंदाही मुंबई इंडियन्सचा संघ स्लो गतीनेच जात आहे, असं दिसतं. मात्र, या संघात मोठे खेळाडू आहेत. त्यामुळं त्यांना आताच दुर्लक्षित करून चालणार नाही. क्रिकेट चाहत्यांकडून संघाचा कप्तान हार्दिक पांड्याला ट्रोल केलं जात आहे. असं ट्रोल करणं योग्य नसल्याचं देखील जतीन परांजपे यांनी म्हटलंय. "मुंबईतील चाहतावर्ग असा कधी वागताना दिसला नव्हता. त्यामुळं खेळाकडं खेळाच्या नजरेनं पहावं, पांड्याला अशी वागणूक देणं योग्य नाही," असं जतीन परांजपे याचं म्हणणं आहे.
हे वाचलंत का? :
- मुंबई इंडियन्सचा दारूण पराभव! राजस्थान रॉयल्सचा 6 गडी राखून दणदणीत विजय - MI vs RR IPL 2024
- कर्णधार झाल्यानंतर हार्दिक पांड्या पहिल्यांदाच करणार मुंबईच्या प्रेक्षकांच्या 'सामना'; मागील दोन सामन्यात झाला ट्रोल - MI vs RR
- 42 वर्षीय धोनीचं अनोखं 'त्रिशतक'; टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील पहिलाच खेळाडू - MS Dhoni Record