कानपूर IND vs BAN 2nd Test Day 3 Weather Report : भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघ यांच्यातील कानपूर कसोटी सामन्यात पाऊस अजूनपर्यंत खलनायक ठरला आहे. पहिल्या दिवशी केवळ 35 षटकांचा खेळ झाला तर दुसऱ्या दिवशी एकही चेंडू टाकता आला नाही. अशा स्थितीत तिसऱ्या दिवसाचा सामनाही पावसानं गमावला जाणार का, असा मोठा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. आम्ही कानपूरच्या तिसऱ्या दिवसाचे हवामान अपडेट घेऊन आलो आहोत. तिसऱ्या दिवशीचा सामना पावसानं पूर्णपणे वाहून जाईल किंवा थोडासा व्यत्यय येईल किंवा पाऊस अजिबात नसेल, कानपूर कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचे हवामान अपडेट जाणून घेऊया.
पहिल्या दिवशी 35 षटकांचा खेळ : या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मानं पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पावसामुळं खेळ एक तास उशिरानं सुरु झाला. पहिल्या सत्राचा खेळ पूर्ण झाला, मात्र दुसऱ्या सत्रात 9 षटकांनंतर पाऊस आला आणि दिवसाचा खेळ रद्द करावा लागला. बांगलादेशनं 3 गडी गमावून 107 धावा केल्या होत्या. यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळं पूर्णपणे वाया गेला.
दुसऱ्या दिवशी एकही चेंडू टाकला गेला नाही : सततच्या पावसामुळं एकही चेंडू न टाकता दुसऱ्या दिवसाचाही खेळ रद्द करण्यात आला. सकाळी हलक्या रिमझिम पावसानंतर मुसळधार पाऊस सुरु झाल्यामुळे ग्रीन पार्क स्टेडियमवर दुसऱ्या दिवशी खेळ होऊ शकला नाही. 11.15 च्या सुमारास पाऊस थांबला तेव्हा ग्राउंड्समननं तीन सुपर सॉपर तैनात केले. प्रकाश देखील स्पष्ट नव्हता, त्यामुळं खेळ अधिकृतपणे 2:15 वाजता रद्द करावा लागला. आता तिसऱ्या दिवसाच्या खेळाकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.