वेलिंग्टन NZ vs ENG 2nd Test :इंग्लंड फलंदाज जो रुटची फलंदाजीत नवनवीन विक्रम करत आहे. त्याला आत्तापर्यंत कोणताही संघ रोखू शकलेला नाही. वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्ह इथं न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी चाहत्यांना पुन्हा एकदा रुटच्या फलंदाजीचा चमत्कार पाहायला मिळाला ज्यामध्ये त्यानं कसोटी कारकिर्दितील 36 वं शतक झळकावलं. यासह जो रुटनं भारतीय दिग्गज फलंदाज राहुल द्रविडच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. रुटच्या दमदार शतकाच्या जोरावर इंग्लंड संघानं वेलिंग्टन कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात न्यूझीलंडला 583 धावांचं अशक्यप्राय लक्ष्य दिलं आहे.
सर्वाधिक कसोटी शतकं झळकावण्याच्या बाबतीत जो रुट पाचव्या स्थानावर :वेलिंग्टन कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर जो रुट अर्धशतक झळकावून नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर, त्यानं तिसऱ्या दिवसाच्या खेळात आपली शानदार खेळी सुरु ठेवली आणि आपल्या कसोटी कारकिर्दीतील 36 वं शतक झळकावलं. 130 चेंडूंचा सामना केल्यानंतर रुट 11 चौकारांच्या मदतीनं 106 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावण्याच्या बाबतीत जो रुट आता राहुल द्रविडसोबत संयुक्तपणे पाचव्या क्रमांकावर आला आहे. या यादीत सचिन तेंडुलकर, जॅक कॅलिस, रिकी पाँटिंग आणि कुमार संगकारा त्याच्या पुढं आहेत, ज्यामध्ये रुट आणखी 2 शतकं ठोकून कुमार संगकाराची बरोबरी करेल.