क्राइस्टचर्च Joe Root Creats History :इंग्लंड क्रिकेट संघाचा अव्वल फलंदाज जो रुट गेल्या काही काळापासून चमकदार कामगिरी करत आहे आणि तो दिवसेंदिवस अधिक चांगला होत आहे. सध्या तो जगातील अशा काही क्रिकेटपटूंपैकी एक आहे ज्यांनी प्रत्येक मैदानावर आपल्या फलंदाजीनं आपली छाप सोडली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात तो मोठी खेळी खेळण्यात यशस्वी ठरला नसला तरीही त्यानं सचिन तेंडुलकरचा एक मोठा विक्रम मोडत इतिहास रचला आहे.
चौथ्या डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज :न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या डावात जो रुटला आपलं खातंही उघडता आलं नव्हतं. तर दुसऱ्या डावात त्यानं नाबाद 25 धावा केल्या, जो सामन्यातील चौथा डाव होता. यासह तो कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षाच्या इतिहासात चौथ्या डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्यानं सचिन तेंडुलकरला मागं टाकलं आहे. जो रुटनं कसोटीच्या चौथ्या डावात आतापर्यंत एकूण 1630 धावा केल्या आहेत. सचिनच्या नावावर 1625 धावा आहेत.
कसोटी क्रिकेटच्या चौथ्या डावात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज :
- जो रुट - 1630*
- सचिन तेंडुलकर- 1625
- ॲलिस्टर कुक- 1611
- ग्रॅम स्मिथ - 1611
- शिवनारायण चंद्रपाल - 1580
कसोटी क्रिकेटमध्ये केल्या 12000 हून अधिक धावा :जो रुटनं 2012 मध्ये इंग्लंडकडून कसोटी पदार्पण केलं होतं. यानंतर तो इंग्लंडच्या फलंदाजीच्या क्रमातील महत्त्वाचा दुवा बनला. आतापर्यंत त्यानं 150 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 12 हजार 777 धावा केल्या आहेत. ज्यात 35 शतकं आणि 64 अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा तो पाचव्या क्रमांकावर आहे. एकदा तो क्रीजवर स्थिरावला की त्याला बाद करणं कठीण होऊन बसतं.
या मालिकेत इंग्लंडनं घेतली आघाडी :या सामन्यात न्यूझीलंडनं इंग्लंडला विजयासाठी 104 धावांचं लक्ष्य दिलं, जे इंग्लिश संघानं अगदी सहज गाठलं. या कसोटी सामन्यात हॅरी ब्रूकनं इंग्लंडकडून 171 धावांची दमदार खेळी केली. याशिवाय, इंग्लंडनं गोलंदाजीचं उत्कृष्ट उदाहरण सादर केलं. ब्रेडन कार्सनं 10 विकेट घेत सामना इंग्लंडच्या दिशेनं वळवला. हा सामना जिंकून इंग्लंडनं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
हेही वाचा :
- कॉन्फिडन्स असावा तर असा... सामन्याच्या 23 तासांआधीच नव्या कर्णधारासह प्लेइंग 11 जाहीर
- भारताविरुद्धचा 'मॅन ऑफ द सीरीज' खेळाडू संघाबाहेर; इंग्रजांविरुद्ध 'कीवीं'चा दारुण पराभव, भारताचा फायदा
- पाकिस्तानविरुद्ध T20 सामना जिंकत झिम्बाब्वे पुन्हा इतिहास रचणार? एतिहासिक मॅच 'इथं' पाहा लाईव्ह