लंडन Joe Root 33rd test hundred : इंग्लंडचा उजव्या हाताचा स्टार फलंदाज जो रुटनं गुरुवारी लॉर्ड्सवर श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी शानदार शतक झळकावून महत्त्वपूर्ण कामगिरी केली. या शतकासह रुटनं इंग्लंडकडून सर्वाधिक 33 कसोटी शतकं झळकावणाऱ्या इंग्लंडचा महान खेळाडू सर ॲलिस्टर कुकच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
रुटनं कूकच्या विक्रमाशी केली बरोबरी : प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर श्रीलंकेनं लॉर्ड्सवर चांगली सुरुवात केली, परंतु जो रूटने विक्रमी 33 वं कसोटी शतक झळकावून त्यांचे मनसुबे हाणून पाडले. जो रुटनं 162 चेंडूत 13 चौकारांच्या मदतीनं आपलं 33 वं कसोटी शतक पूर्ण केलं. इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुट 33वं शतक झळकावल्यानंतर कसोटीत सर्वाधिक शतक झळकावणारा संयुक्तपणे 10वा खेळाडू बनला आहे. रुटचं हे यश विशेष आहे कारण त्यानं हा विक्रम आपल्या 145 व्या सामन्यात केला होता, तर कुकनं यासाठी 161 सामने खेळले.
कसोटीत सर्वाधिक धावा करणारा 7वा फलंदाज : रुटनं अलीकडेच त्याच्या 12 हजार कसोटी धावा पूर्ण केल्या होत्या. यासह तो आतापर्यंतचा सातवा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. रुटनं 145 कसोटी सामन्यांच्या 265 डावांमध्ये 50.71 च्या उत्कृष्ट सरासरीनं एकूण 12 हजार 274 धावा केल्या आहेत. यात त्यानं 5 द्विशतकं, 33 शतकं आणि 64 अर्धशतकं केली आहेत.