दुबई Jay Shah ICC Chairman : भारतीय क्रिकेटला मोठ्या उंचीवर नेल्यानंतर जय शाह यांनी आपली नवी इनिंग सुरु केली आहे. जय शाह यांनी आयसीसी अध्यक्षपदाचा कार्यकाळ सुरु केला आहे. यासह ते आयसीसीचा सर्वात तरुण अध्यक्ष बनले आहे. सध्या त्यांचं वय अवघे 35 वर्षे आहे. यासह ते आयसीसीवर राज्य करणारे पाचवे भारतीय ठरले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीवरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जय शाह यंनी आयसीसीचं अध्यक्षपद स्वीकारलं आहे, त्यामुळं आता या स्पर्धेबाबत घेतलेल्या निर्णयांमध्ये जय शाह महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
जय शहा यांनी स्वीकारलं आयसीसीचं अध्यक्षपद : 2019 मध्ये जय शाह यांना बीसीसीआय सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली होती. जय शाह यांनी जवळपास 6 वर्षे बीसीसीआयमध्ये काम केलं आहे. यासोबतच ते जानेवारी 2021 पासून आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्षही झाले होते. आता जय शाह आयसीसीसाठी काम करणार आहेत. त्यांनी ग्रेग बार्कले यांची जागा घेतली आहे, जे सलग दोन वेळा आयसीसीचे अध्यक्ष होते. जय शाह यांच्या कार्यकाळातील पहिली आयसीसी स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, ज्याबाबत निर्णय घेणं बाकी आहे. वास्तविक, पाकिस्तान या स्पर्धेचं आयोजन करत आहे, परंतु भारताला त्यांचे सामने हायब्रीड मॉडेलवर हवे आहेत, ज्यावरुन गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु आहे.
कार्यकाळाच्या सुरुवातीलाच काय म्हणाले :जय शाह यांनी आयसीसी अध्यक्ष म्हणून आपल्या भूमिकेत सांगितलं की, 'आयसीसी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारण्याचा मला सन्मान वाटतो आणि आयसीसी संचालक आणि सदस्य मंडळांच्या पाठिंब्याबद्दल आणि विश्वासाबद्दल मी कृतज्ञ आहे. आम्ही 2028 ऑलिम्पिक खेळांसाठी तयारी करत असताना आणि जगभरातील चाहत्यांसाठी क्रिकेटला अधिक समावेशक आणि आकर्षक बनवण्यासाठी काम करत असताना हा खेळासाठी एक रोमांचक काळ आहे. बहुविध स्वरुपांचं सहअस्तित्व आणि महिलांच्या खेळाच्या वाढीला गती देण्याची गरज असलेल्या आम्ही एका महत्त्वपूर्ण वळणावर आहोत.'
2009 पासून क्रिकेटशी संबंधित : जय शाह 2009 पासून क्रिकेट जगताशी जोडले गेले आहेत. 2009 मध्ये त्यांनी गुजरात क्रिकेट असोसिएशनमधून आपला प्रवास सुरु केला. आपल्या कार्यकाळात त्यांनी अहमदाबादमधील जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमच्या विकासावर देखरेख केली. यानंतर त्यांनी 2019 मध्ये बीसीसीआयमध्ये प्रवेश केला. जय शाह यांच्या आधी केवळ चार भारतीयांनी आयसीसी अध्यक्षपद भूषवलं होतं. त्यांच्या आधी जगमोहन दालमिया, शरद पवार, एन. श्रीनिवासन आणि शशांक मनोहर यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे.
हेही वाचा :
- भारत-ऑस्ट्रेलिया 'पिंक बॉल' कसोटीपूर्वी दिग्गज खेळाडूचं निधन; क्रिकेट विश्वात शोककळा
- रिमेम्बर द नेम जो रुट... इंग्रज फलंदाजानं सचिनचा विक्रम मोडत केला ऐतिहासिक विश्वविक्रम