ॲडलेड AUS vs IND Pink Ball Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारतीय संघ 180 धावांवर ऑलआऊट झाला. ॲडलेडमध्ये खेळल्या जात असलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतर भारताच्या गोलंदाजांवर मोठी जबाबदारी येऊन पडली. यानंतर जसप्रीत बुमराहनं ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाला बाद करुन भारताला पहिलं यश मिळवून दिलं. या विकेटसह बुमराहनं एक मोठी कामगिरी केली आहे.
2024 मध्ये बुमराहचा आणखी एक विक्रम : जसप्रीत बुमराह यंदा अप्रतिम फॉर्ममध्ये दिसत आहे. त्यानं 2024 मध्ये भारतीय संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. दरम्यान, त्यानं यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये 50 बळी पूर्ण केले आहेत. यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला आहे. आतापर्यंत 2024 मध्ये 50 विकेट्सचा आकडा इतर कोणत्याही गोलंदाजानं गाठलेला नाही. उस्मान ख्वाजाला बाद करत बुमराहनं ही कामगिरी केली. भारताविरुद्धच्या या सामन्यात उस्माननं केवळ 13 धावांची खेळी केली आहे.