नवी दिल्ली Jasprit Bumrah ICC Ranking : भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह कसोटी क्रिकेट क्रमवारीत 'नंबर वन' गोलंदाज बनलाय. जसप्रीत बुमराह हा एकदिवसीय, टी20 आणि कसोटी क्रिकेटमध्ये 'नंबर वन' गोलंदाज बनणारा पहिला गोलंदाज ठरलाय. आज जाहीर केलेल्या नवीन आयसीसी कसोटी क्रमवारीत जसप्रीत बुमराहनं हे स्थान गाठलंय. जसप्रीत बुमराहनं नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 9 बळी घेत सामनावीराचा पुरस्कारही जिंकला होता. अवघे 34 सामने खेळल्यानंतर जसप्रीत बुमराहनं कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान गाठलंय. बुमराहशिवाय अश्विन आणि जडेजा यांचाही पहिल्या 10 गोलंदाजांमध्ये समावेश आहे.
जसप्रीत बुमराहनं रचला इतिहास :जसप्रीत बुमराह कसोटीत 'नंबर वन' बनणं ही एक मोठी गोष्ट आहे. क्रिकेटच्या इतिहासातील तो एकमेव असा गोलंदाज आहे, ज्यानं प्रत्येक प्रकारात 'नंबर वन' स्थान पटकावलंय. बुमराह एकदिवसीय आणि टी-20 मध्ये 'नंबर वन' बनला होता. आता त्यानं कसोटीतही हे स्थान गाठलंय. पहिल्या क्रमांकावर कसोटी क्रमवारीत पोहोचणारा जसप्रीत बुमराह पहिला भारतीय गोलंदाज बनलाय.
बुमराह अव्वल, अश्विनला फटका : जसप्रीत बुमराह भारताचा स्टार फिरकीपटू आर अश्विनला मागे सारत कसोटी क्रिकेटमधील 'नंबर वन' गोलंदाज बनलाय. ताज्या क्रमवारीत अश्विनचे दोन स्थान कमी झाले असून तो तिसऱ्या स्थानावर घसरलाय. जसप्रीत बुमराहनं तीन स्थानांची झेप घेतलीय. बुमराहनं 881 गुणांसह अव्वल स्थान पटकावलंय. दक्षिण आफ्रिकेचा स्टार वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा हा क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. रबाडाचे 851 गुण आहेत. तर आर अश्विन 841 गुणांसह आयसीसी कसोटी क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचा स्टार फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा 746 गुणांसह गोलंदाजांच्या क्रमवारीत 9व्या स्थानावर घसरलाय.