लंडन James Anderson Announces Retirement : इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसननं क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलीय. अँडरसन आपला शेवटचा कसोटी सामना या वर्षी जुलै महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध क्रिकेटच्या मक्का, लॉर्ड्स इथं खेळणार आहे. हा कसोटी सामना 10 ते 14 जुलै दरम्यान होणार आहे. 41 वर्षीय अँडरसननं 2003 मध्ये लॉर्ड्सवर कसोटी पदार्पण केलं होतं. त्यानं 187 कसोटी सामन्यात 700 बळी घेतले आहेत. अँडरसन हा 700 कसोटी बळींचा पल्ला गाठणारा पहिला वेगवान गोलंदाज आहे. भारताविरुद्धच्या धर्मशाला कसोटी सामन्यात कुलदीप यादवला बाद करुन अँडरसननं यावर्षी 700 बळी पूर्ण केलं.
निवृत्तीबाबत काय म्हणाला अँडरसन : निवृत्तीबाबत बोलताना अँडरसन म्हणाला, "लॉर्ड्सवर या उन्हाळ्यात होणारी पहिली कसोटी ही माझी शेवटची कसोटी असेल. लहानपणापासून मला आवडलेल्या खेळात माझ्या देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी. ही 20 वर्षे माझ्यासाठी अविश्वसनीय आहेत. इंग्लंडकडून खेळताना मला खूप आठवण येईल. पण मला माहित आहे की, या खेळापासून दूर जाण्याची आणि इतरांना संधी देण्याची हीच योग्य वेळ आहे. माझी जशी स्वप्नं सत्यात उतरली तशी त्यांची स्वप्नं साकार करा कारण यापेक्षा मोठी भावना नाही. डॅनिएला, लोला रुबी आणि माझ्या पालकांच्या प्रेम आणि पाठिंब्याशिवाय मी हे करु शकलो नसतो. त्यांचे अनेक आभार तसंच त्या खेळाडूंचे आणि प्रशिक्षकांचे आभार ज्यांनी हे जगातील सर्वोत्तम काम केलं. नवीन आव्हानांसाठी मी उत्सुक आहे. वर्षानुवर्षे मला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे आभार."