मुंबई MI vs LSG Match IPL 2024 : आयपीएलच्या या हंगामातील 67 वा सामना शुक्रवारी वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळवण्यात आला. मुंबई आणि लखनऊ संघात खेळवण्यात आलेल्या या सामन्यात लखनऊ संघ पुन्हा एकदा मुंबई संघावर वरचढ ठरला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळणारा मुंबईचा संघ अगोदरच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. रोहित शर्मा आणि नमन धीर यांच्या अर्धशतकानंतरही मुंबईच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. लखनऊ संघानं दिलेलं 215 धावांचं लक्ष्य पार करताना मुंबईचा संघ 196 धावांवर गुंडाळण्यात लखनऊच्या गोलंदाजांना यश आलं.
रोहित शर्माची घरच्या मैदानावर तुफान फटकेबाजी :शेवटच्या आयपीएल सामन्यात लखनऊ संघानं मुंबई संघाला 215 धावांचं लक्ष्य दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची आक्रमक सुरुवात झाली. मुंबईचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा यानं घरच्या मैदानावर खेळताना तुफान फटकेबाजी केली. त्यानं डेवाल्ड ब्रेविस याच्या जोडीनं 88 धावांची भागीदारी केली. मात्र डेवाल्ड 20 चेंडूत 23 धावा काढून तंबूत परतला. नवीन उल हकनं त्याला बाद केलं. डेवाल्डनं दोन षटकार आणि एक चौकार ठोकत आक्रमक सुरुवात केली. मात्र मोठी धावसंख्या उभारण्यात त्याला अपयश आलं. एका बाजुला एकापाठोपाठ गडी बाद होत गेले. मात्र मुंबईचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मानं आपल्या घरच्या मैदानावर खेळताना लखनऊच्या संघाची गोलंदाजी फोडून काढली. त्यानं 38 चेंडूत 3 षटाकर आणि 10 चौकार मारत आपले इरादे स्पष्ट केले. मात्र रवि बिश्नोईनं त्याला बाद करण्यात यश मिळवलं. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मुंबईचा डाव गडगडला. अनुभवी फलंदाज सूर्यकुमार यादव याला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे मुंबईचे फलंदाज 196 धावात गुंडाळण्यात लखनऊ संगाला यश आलं.
हार्दिक पांड्याला ठोठावला दंड :मुंबई आणि लखनऊ संगात खेळवण्यात आलेल्या आयपीएलच्या सामन्यात लखनऊ संघ पुन्हा एकदा मुंबई संघावर वरचढ ठरला. मात्र या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्या अपयशी ठरला. त्यानं केवळ 13 चेंडूत 13 धावा केल्या. नेहाल वढेरा यालाही फलंदाजीत चमक दाखवता आली नाही. त्यानं 3 चेंडूत केवळ एक धाव काढली. फलंदाजी ढेपाळल्यानं लखनऊ संघानं मुंबई संघावर मात करत मुंबईला आयपीएल स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला. दुसरीकडं मुंबई संघानं मंदगतीनं गोलंदाजी केल्यानं कर्णधार हार्दिक पांड्याला सामन्याच्या फिमधून 30 टक्के दंड आणि एका सामन्यासाठी बंदीची कारवाई करण्यात आली. त्यामुळे हार्दिक पांड्याला चांगलाच धक्का बसला आहे.
दोन्ही संघासाठी ही आयपीएल स्पर्धा खडतर :हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळणारा मुंबई इंडियन्स संघ आणि लखनऊ जायट्स संघ या दोन्ही संघासाठी ही आयपीएल स्पर्धा मोठी खडतर राहिली. लखनऊ संघानं आतापर्यंत 14 सामने खेळले असून त्यातील 7 सामने जिंकले. तर दुसरीकडं तब्बल 5 वेळा आयपीएल स्पर्धा जिंकल्यानंतर मुंबईच्या संघानं या स्पर्धेत केवळ 4 विजय मिळवले आहेत. या हंगामातील शेवटच्या सामन्यातही मुंबई संघाला पराभवाची नामुष्की पत्करावी लागली आहे.