हैदराबाद Jasprit Bumrah In T20 World Cup 2024 : अमेरिका-वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या टी 20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाची विजयी घौडदौड सुरुच आहे. साखळी टप्प्यातील सामन्यांमध्ये भारतीय संघानं पाकिस्तान, आयर्लंड आणि अमेरिकेचा पराभव केला. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं सुपर-8 फेरीचीही शानदार सुरुवात केली. सुपर-8 फेरीच्या पहिल्या सामन्यात भारतानं शेजारी अफगाणिस्तानचा एकहाती पराभव केला. संघाच्या विजयात भारतीय फलंदाजांव्यतिरिक्त गोलंदाजही आपलं काम चोख बजावत आहेत. पण या स्पर्धेतील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या कामगिरीची आकडेवारी आश्चर्यचकीत करणारी आहे.
जसप्रीत बुमराहची आकडेवारी : या टी 20 विश्वचषकातील जसप्रीत बुमराहच्या कामगिरीची आकडेवारी जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. या स्पर्धेत आतापर्यंत जसप्रीत बुमराहनं 15 षटकं गोलंदाजी केली. बुमराहच्या गोलंदाजीवर विरोधी संघाचे फलंदाज केवळ 3 चौकार आणि 1 षटकार मारु शकले आहेत. तसंच जसप्रीत बुमराहनं विरोधी संघातील 8 फलंदाजांच्या विकेट घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराह ज्या प्रकारे महत्त्वाच्या प्रसंगी भारतासाठी विकेट घेण्यासह धावा रोखण्याचंही काम करत आहेत, त्यावरुन तो या स्पर्धेत भारतासाठी हुकमी एक्का ठरत आहे, हे नक्की.