पर्थ BGT 2024-25 : भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबरला होणार आहे. या मालिकेसाठी भारतानंही आपला संघ जाहीर केला आहे. भारतीय संघातील काही खेळाडू ऑस्ट्रेलियालाही पोहोचले आहेत. दोन्ही संघांदरम्यान खेळली जाणारी ही कसोटी मालिका बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी म्हणून ओळखली जाते. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय संघाची कामगिरी अप्रतिम राहिली आहे, पण ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचे आकडे काही खास नाहीत. मात्र, गेल्या दोन दौऱ्यांपासून भारतीय संघानं कामगिरीत सुधारणा केली आहे.
ऑस्ट्रेलियात भारतीय संघाची कामगिरी कशी : भारतीय संघानं बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी सात वेळा ऑस्ट्रेलियाचा दौरा केला आहे. या सात मालिकेदरम्यान दोन्ही संघांमध्ये एकूण 27 कसोटी सामने खेळले गेले आहेत. तर भारतीय संघानं या 27 पैकी फक्त 6 मॅच जिंकल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियानं 14 सामने जिंकले आहेत. याशिवाय 7 सामने अनिर्णित राहिले आहेत. भारताच्या सहापैकी चार विजय गेल्या दोन दौऱ्यांमध्ये मिळाले आहेत. भारतीय संघानं 2012 मध्ये एकदा ऑस्ट्रेलियालाही क्लीन स्वीप केलं होतं.