नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे. ज्यात सहभागी होण्यासाठी भारतीय क्रिकेट संघानं पाकिस्तानच्या भूमीवर पाय ठेवण्यास नकार दिला आहे. भारत सरकारकडून परवानगी न मिळाल्यानं BCCI नं हा मोठा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनावर टांगती तलवार आहे. दरम्यान, पाकिस्तानसाठी आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय संघानंतर आता भारतीय अंध क्रिकेट संघानंही पाकिस्तानला जाण्यास नकार दिला आहे. हा संघ पाकिस्तानमध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकात सहभागी होणार होता पण भारत सरकारनं सुरक्षेच्या कारणास्तव या संघाला पाकिस्तानात जाण्याची परवानगी दिली नाही. राष्ट्रीय महासंघानं 19 नोव्हेंबर रोजी ही माहिती दिली.
पाकिस्तानात जाण्याची परवानगी मिळाली नाही : इंडियन ब्लाइंड क्रिकेट असोसिएशनचे (IBCA) सरचिटणीस शैलेंद्र यादव यांनी पीटीआयला सांगितलं की, अंध क्रिकेट संघाला पाकिस्तानात जाण्याची परवानगी दिली जाणार नाही, असं त्यांना अनौपचारिकपणे कळवण्यात आलं आहे. त्यांचा संघ आज वाघा बॉर्डरवर जाणार होता. मात्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळं ते थोडे निराश झाले आहेत. तसंच त्यांना वेळीच माहिती दिली असती तर निवड चाचण्यांद्वारे संघ निवडण्याच्या प्रक्रियेतून ते वाचले असते, असंही यादव म्हणाले.