नवी दिल्ली Hardik Pandya : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) ताज्या क्रमवारीत हार्दिक पांड्यानं टी 20 मध्ये अष्टपैलू खेळाडूच्या श्रेणीत पहिलं स्थान पटकावलं आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू पांड्यानं आयसीसी क्रमवारीत प्रथमच अशी कामगिरी केली आहे. यासह हार्दिक पांड्यानं इतिहास रचलाय. टी 20 क्रिकेटमध्ये आयसीसीच्या क्रमवारीत अष्टपैलू खेळाडूच्या श्रेणीत अव्वल स्थान पटकावणारा हार्दिक पांड्या हा पहिलाच भारतीय खेळाडू बनलाय.
पहिलाच भारतीय खेळाडू : नुकत्याच पार पडलेल्या टी 20 विश्वचषकात हार्दिक पांड्याच्या दमदार कामगिरीमुळं, तो आयसीसी पुरुषांच्या टी 20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू बनला आहे. आयसीसीच्या नव्या क्रमवारीनंतर हार्दिक पांड्यानं दोन स्थानांची प्रगती केली आहे. हार्दिक आता श्रीलंकेचा स्टार वानिंदू हसरंगासह अव्वल क्रमांकावर असलेला अष्टपैलू खेळाडू बनला आहे. हार्दिकनं टी 20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांच्या महत्त्वाच्या विकेट्स घेत सामन्याचं रुप पालटलं आणि दक्षिण आफ्रिकेवर भारताच्या 7 धावांनी विजय मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. टी 20 विश्वचषकात फलंदाजी आणि गोलंदाजीत हार्दिकचं योगदान भक्कम होतं. यामुळं या श्रेणीत पहिल्या क्रमांकावर पोहोचणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
पांड्याची टी 20 विश्वचषक 2024 मधील कामगिरी : हार्दिक पांड्यानं 2024 च्या टी 20 विश्वचषकातील 8 सामन्यांत 144 धावा केल्या. यात त्याची सरासरी 48 होती. तर गोलंदाजीत पांड्यानं 7.64 च्या इकॉनॉमी रेटनं गोलंदाजी केली आणि या 8 सामन्यांमध्ये 11 बळी घेतले. तसंच हार्दिक पांड्यानं टी 20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात 20 धावांत 3 बळी घेतले तर फलंदाजीत 5 धावांवर नाबाद राहिला. आफ्रिकन संघाला विजयासाठी 16 धावांची गरज असताना टी 20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पांड्यानं शेवटचं षटक टाकलं. परंतु यात पांड्यानं केवळ 8 धावा दिल्या.
2024 च्या टी 20 विश्वचषकात हार्दिकची कामगिरी :
- हार्दिकनं आयर्लंडविरुद्ध 27 धावांत 3 विकेट घेतल्या होत्या.
- हार्दिकनं पाकिस्तानविरुद्ध फलंदाजीत 7 धावा केल्या नंतर गोलंदाजीत 24 धावांत 2 बळी घेतले होते.
- हार्दिकनं अमेरिकेविरुद्ध 2 विकेट घेतल्या होत्या.
- हार्दिकनं अफगाणिस्तानविरुद्ध फलंदाजीत 32 धावांची खेळी खेळली होती.
- हार्दिकनं बांगलादेशविरुद्ध फलंदाजी करताना आक्रमक 50* धावा केल्या, त्यानंतर गोलंदाजीत एक विकेटही घेतली.
- हार्दिकनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजीत 27 धावांची नाबाद खेळी खेळली होती.
- हार्दिकनं इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यात फलंदाजीत 23 धावा केल्या होत्या.
- हार्दिकनं अंतिम सामन्यात 20 धावांत तीन विकेट घेतल्या होत्या.
हेही वाचा :
- विश्वविजेत्या भारतीय संघावर बक्षिसांचा वर्षाव; खेळाडू होणार मालामाल, बीसीसीआयनं केली मोठी घोषणा - Prize Money For Team India
- चक दे इंडिया! विश्वचषकातील विजयानंतर सचिन तेंडुलकर, धोनीसह दिग्गज खेळाडूंकडून भारतीय संघाचं अभिनंदन - T20 World Cup 2024 Final