राजकोट Highest ODI Team Total : भारत आणि आयर्लंड महिला क्रिकेट संघ दुसऱ्या वनडे सामन्यात आमनेसामने आहेत. या सामन्यात भारतीय महिला संघाची कर्णधार स्मृती मंधानानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. भारतीय फलंदाजांनी शानदार कामगिरी करत आयर्लंडसमोर 370 धावांचा डोंगर उभा केला. भारताकडून स्मृती मानधना, हरलीन देओल आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी शानदार फलंदाजी केली.
कर्णधार स्मृती मानधनानं झळकावलं दमदार अर्धशतक :भारताकडून कर्णधार स्मृती मानधना आणि प्रीतिका रावल सलामीला आल्या. या दोन्ही खेळाडूंनी संघासाठी 156 धावांची भागीदारी केली आणि भारतासाठी मोठ्या धावसंख्येचा मजबूत पाया रचला. मंधानानं 73 आणि रावलने 67 धावा केल्या. यानंतर हरलीन देओलनंही अर्धशतक झळकावलं. तर चौथ्या क्रमांकावर आलेल्या जेमिमा रॉड्रिग्जनं एक दमदार शतक झळकावलं. जेमिमानं फक्त 91 चेंडूत 12 चौकारांसह 102 धावा केल्या. या खेळाडूंमुळंच भारतीय महिला संघाला 370 धावांचा मोठा स्कोअर करण्यात यश आलं.
भारतीय महिला संघाची वनडेमध्ये सर्वोत्तम धावसंख्या : 370 धावा ही भारतीय महिला संघाची वनडे क्रिकेटमधील सर्वोत्तम धावसंख्या आहे. यापूर्वी 2017 मध्ये भारतानं आयर्लंडविरुद्ध वनडे सामन्यात 358 धावा केल्या होत्या. त्याच वेळी, 2024 मध्ये भारतानं वेस्ट इंडिजविरुद्ध एका वनडे सामन्यात 358 धावा केल्या होत्या. ज्या त्यांच्या वनडे सामन्यातील सर्वोत्तम धावा होत्या. पण स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्या दमदार खेळीमुळं भारतानं आता हा विक्रम खूप मागे टाकला आहे.