वडोदरा India Clean Sweep West Indies in ODI : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघ यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना वडोदरा इथं खेळला गेला. हा सामना जिंकून भारतीय संघानं वेस्ट इंडिजचा मालिकेत 3-0 असा क्लीन स्वीप केला आहे. भारतानं तिसरा सामना 5 विकेटनं जिंकला. दीप्ती शर्मानं हा सामना जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तिसऱ्या सामन्यात दीप्तीनं अप्रतिम गोलंदाजी करत एक खास विक्रम आपल्या नावावर केला.
भारतानं 5 विकेटनं जिंकला सामना :या सामन्यात वेस्ट इंडिजनं प्रथम फलंदाजी करताना 38.5 षटकात केवळ 162 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून फलंदाजी करताना चिनेल हेन्रीनं सर्वाधिक 61 धावांची खेळी केली. तर भारताकडून गोलंदाजी करताना दीप्ती शर्मानं सर्वाधिक 6 विकेट घेतल्या. याशिवाय रेणुका सिंगनं 4 विकेट घेतल्या. यानंतर 163 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाची सुरुवातही विशेष झाली नाही. भारतानं 55 धावांतच 3 विकेट गमावल्या होत्या. भारतीय संघानं हे लक्ष्य 28.2 षटकात 5 विकेट गमावून पूर्ण केले. भारताकडून फलंदाजी करताना दीप्ती शर्मानंच सर्वाधिक 39 धावांची नाबाद खेळी खेळली. याशिवाय कर्णधार हरमनप्रीत कौरनं 32 धावा केल्या. तर जेमिमानं 29 धावांची इनिंग खेळली होती. तर ऋचा घोष 29 धावा करुन नाबाद राहिली.