दुबई IND vs PAK Cricket Matches : ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पुढील वर्षी पाकिस्तानात होणार आहे. भारतीय क्रिकेट संघानं या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) नुकतीच पुष्टी केली आहे की पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाण्यास भारतानं आपल्या अनिच्छेबद्दल ICC ला कळवलं आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत-पाकिस्तान सामन्यावर अजूनही साशंकता असली तरी, 2024 च्या अखेरीस भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक नव्हे तर प्रत्येकी 2 सामन्यांमध्ये सामना होणार आहे. येत्या काही दिवसांत भारत आणि पाकिस्तानमध्ये दोन सामने होणार आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही प्रमुख सामने महिनाभरात खेळवले जाणार आहेत. म्हणजेच चाहत्यांना भारत-पाकिस्तान सामन्याचा आनंद दोनदा घेता येणार आहे. चला आता या दोन शानदार सामन्यांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
वास्तविक, आशियाई क्रिकेट परिषद म्हणजेच ACC नं आशिया कपचं वेळापत्रक जाहीर केले आहे. महिला अंडर-19 आशिया चषक स्पर्धेच्या उद्घाटन हंगामासाठी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान या संघांना एकाच गटात ठेवण्यात आलं आहे. ही स्पर्धा मलेशियामध्ये होणार असून, यामध्ये सर्व 6 संघांना प्रत्येकी तीन संघांच्या दोन गटात विभागण्यात आलं आहे. अ गटात भारत, पाकिस्तान आणि नेपाळ यांचा समावेश आहे, तर ब गटात बांगलादेश, श्रीलंका आणि यजमान मलेशिया यांचा समावेश आहे. या स्पर्धेचे सर्व सामने क्वालालंपूर येथील ब्यूमास ओव्हल इथं होणार आहेत.
15 डिसेंबर रोजी यजमान मलेशिया आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यानं या स्पर्धेला सुरुवात होईल. त्याच दिवशी दुसऱ्या सामन्यात भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. दुसऱ्या दिवशी श्रीलंकेचा सामना बांगलादेशशी, त्यानंतर पाकिस्तानचा सामना नेपाळशी होणार आहे. गट टप्प्यातील शेवटचा सामना 17 डिसेंबर रोजी होणार आहे. या दिवशी बांगलादेशचा सामना मलेशियाशी होईल, त्यानंतर भारताचा सामना नेपाळशी होईल. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ 19 आणि 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या 'सुपर फोर राऊंड'मध्ये प्रवेश करतील, तर पाचव्या/सहाव्या स्थानासाठीचा प्ले-ऑफ 18 डिसेंबर रोजी होईल. 'सुपर फोर' मधील अव्वल दोन संघ 22 डिसेंबरला अंतिम फेरीत पोहोचतील.