पल्लेकेले IND vs SL T20I : भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघात आजपासून (27 जुलै) टी 20 मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघानं फलंदाजीनंतर गोलंदाजीत शानदार कामगिरी करत 43 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकांत 7 बाद 213 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 170 धावांपर्यंत मजल मारु शकला. भारताकडून रियान परागनं सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.
सूर्याचं अर्धशतक : या सामन्यात भारतीय संघानं नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट गमावत 213 धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी चांगली फलंदाजी केली आणि दोघांनी 6 षटकांत 74 धावांची भागीदारी केली. शुभमन गिलनं 16 चेंडूत 6 चौकार आणि एका षटकारासह 34 धावा केल्या. शुभमनला दिलशान मदुशंकानं बाद केलं. शुभमननंतर श्रीलंकेला वानिंदू हसरंगाच्या चेंडूवर यष्टिचित झालेल्या यशस्वीची विकेटही मिळाली. यशस्वीनं 21 चेंडूंत 5 चौकार आणि दोन षटकारांसह 41 धावा केल्या. तसंच भारतीय कर्णधार सूर्यकुमारनं 26 चेंडूत 58 धावा केल्या.
दोन्ही संघाचे नवे कर्णधार : टी 20 मालिकेतील सर्व सामने पल्लेकेले इथं होणार आहेत. यावेळी दोन्ही संघांचे कर्णधार नवीन आहेत. सूर्यकुमार यादव भारताचं कर्णधारपद भूषवत आहेत, तर चरिथ असालंका श्रीलंकेच्या टी 20 संघाचं नेतृत्व करत आहे. या मालिकेद्वारे भारतीय क्रिकेटमध्ये गौतम गंभीरच्या प्रशिक्षक युगाची सुरुवात होणार आहे.