पॅरिस Paris Olympics 2024 : आज पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला पहिल्या सुवर्णपदकाची आशा आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणाऱ्या नीरज चोप्राकडे सर्वांच्या नजरा असतील. भालाफेकचा अंतिम सामना रात्री 11.55 वाजता सुरु होणार आहे. पात्रता फेरीत भारतीय स्टारनं पहिल्या थ्रोमध्ये 89 मीटर भालाफेक करुन अंतिम फेरीत आपलं स्थान आधीच पक्कं केलं होतं. तसंच पाकिस्तानचा भालाफेकपटू नदीम अर्शदही पदकासाठी आपला दावा मांडत आहे. अशा परिस्थितीत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज एकप्रकारे भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे.
पाकिस्तानी खेळाडूंनी दिल्या शुभेच्छा : कोणत्याही खेळात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा मजेशीर असतो. याकडं संपूर्ण जगाचं लक्ष असतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे क्रिकेट असो वा ऑलिम्पिक, भारतीय खेळाडू नेहमी पाकिस्तानला मागं टाकतात. पॅरिस ऑलिम्पिकमध्येही भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये स्पर्धा होणार आहे. भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा पुन्हा एकदा सुवर्णपदक जिंकणार आहे, तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमलाही त्याच्या देशासाठी पदक जिंकण्याची इच्छा असणार आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानचा भालाफेकपटू नदीम अर्शदला पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंनी शुभेच्छा दिल्या आहेत. यासंदर्भात एक व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केलाय.
नीरज आणि नदीममध्ये टक्कर : पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक पात्रता स्पर्धेत भारतीय स्टार नीरज चोप्रानं 89.34 मीटर अंतर गाठून अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं. तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं 86.59 मीटरपर्यंत भालाफेक करुन अंतिम फेरीतील आपलं तिकीट निश्चित केलं. आता आज रात्री 11.55 वाजता हे दोन्ही खेळाडू आपापल्या देशासाठी पदक जिंकण्यासाठी खेळणार आहेत. पॅरिस ऑलिम्पिक 2024 चं भारतात स्पोर्ट्स 18 नेटवर्क टीव्ही चॅनेलवर थेट प्रक्षेपण केलं जात आहे. तसंच हा सामना तुम्ही जीओ सिनेमा ॲप आणि वेबसाइटवर पॅरिस ऑलिम्पिक 2024 चे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता, जे पूर्णपणे विनामूल्य आहे.