अहमदाबाद INDW vs NZW 2nd ODI Live Streaming : भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच 27 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुपारी दीड वाजल्यापासून खेळवला जाईल. या मालिकेत भारतीय संघाची कमान हरमनप्रीत कौरच्या खांद्यावर आहे. दरम्यान, न्यूझीलंडचं नेतृत्व सोफी डिव्हाईन करत आहे.
भारताची मालिकेत 1-0 अशी आघाडी : भारतीय महिला संघ तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 नं आघाडीवर आहे. पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघानं न्यूझीलंडचा 59 धावांनी पराभव केला होता. पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघ 44.3 षटकांत 227 धावांवर बाद झाली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 40.4 षटकांत 168 धावांवर गारद झाला. अशा स्थितीत दुसरा वनडे जिंकून भारतीय संघ मालिकेवर कब्जा करण्याचे ध्येय ठेवणार आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडला दुसरा वनडे सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधायची आहे.
दोन्ही संघाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : भारत आणि न्यूझीलंड महिला क्रिकेट संघ आतापर्यंत वनडे सामन्यांमध्ये एकूण 55 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यात न्यूझीलंडचा वरचष्मा दिसत आहे. न्यूझीलंडनं 33 सामने जिंकले आहेत. तर भारतानं केवळ 21 सामने जिंकले आहेत. याशिवाय एक सामना अनिर्णित राहिला.
खेळपट्टी कशी असेल : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाजांपेक्षा फलंदाजांसाठी अधिक योग्य आहे. फलंदाज मोठ्या धावा बोर्डवर ठेवू शकतात आणि दव दुसऱ्या हाफमध्ये गोष्टी सुलभ करु शकतात. नाणेफेक जिंकणारा संघ इथं लक्ष्याचा पाठलाग करण्याचा निर्णय घेईल. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना अधिक फायदा होतो. या खेळपट्टीवर 32 एकदिवसीय सामन्यांमध्ये पहिल्या डावात सरासरी 243 धावा आहेत. खेळ जसजसा पुढं जाईल तसतसे फिरकीपटू खेळात येतील अशी अपेक्षा आहे, परंतु वेगवान गोलंदाजांना नवीन चेंडू आणि वेगातील फरकांचा प्रभावीपणे उपयोग करावा लागेल.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा वनडे सामना कधी खेळला जाईल?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना रविवार, 27 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता खेळवला जाईल.