महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IND vs ENG 1st ODI Live: सर जडेजा, हर्षितची घातक गोलंदाजी; नागपुरात ब्रिटीश ऑलआउट - ODI LIVE MATCH

भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघातील वनडे मालिकेतील पहिला सामना नागपुरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळवला जात आहे.

IND vs ENG 1st ODI
IND vs ENG 1st ODI (AP Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Feb 6, 2025, 1:15 PM IST

Updated : Feb 6, 2025, 5:16 PM IST

नागपूर IND vs ENG 1st ODI Live : भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघातील वनडे मालिका आजपासून म्हणजेच 6 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. यातील पहिला वनडे नागपूरच्या व्हिसिए मैदानावर खेळवला जात आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया बऱ्याच काळानंतर वनडे मालिका खेळत आहे. T20 मालिकेत दारुण पराभव पत्करल्यानंतर, इंग्लंडसमोर वनडे मालिकेत पुनरागमन करण्याचं आव्हान असेल. मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात टीम इंडियाकडून यशस्वी जयस्वाल आणि हर्षित राणा यांना वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. यानंतर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा डाव 47.4 षटकांत 248 धावांवर संपुष्टात आला आहे.

8 चेंडूत गमावल्या 3 विकेट :या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लिश संघाची सुरुवात वादळी झाली. इंग्लिश संघानं फक्त 6 षटकांत 50 धावा पूर्ण केल्या. दरम्यान, सहाव्या षटकात फिल सॉल्टनं हर्षित राणाच्या गोलंदाजीवर 26 धावा (6, 4, 6, 4, 0, 6) केल्या. दुसरा सलामीवीर बेन डकेटनंही शमीविरुद्ध काही उत्कृष्ट फटके खेळले. भारताला पहिलं यश 75 धावांवर मिळालं, फिल साल्ट श्रेयस अय्यरच्या थ्रोवर धावबाद झाला. साल्टनं 26 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं वादळी 43 धावा केल्या. त्यानंतर हर्षित राणानं दुसरा सलामीवीर बेन डकेटला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. डकेटचा झेल यशस्वी जयस्वालनं घेतला. डकेटनं 29 चेंडूत 32 धावा केल्या, ज्यात सहा चौकारांचा समावेश होता. 10व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हर्षितनं हॅरी ब्रूकला केएल राहुलकडून विकेटमागे झेलबाद केलं. अशाप्रकारे इंग्लंडनं आक्रमक सुरुवातीनंतर 8 चेंडूत 3 विकेट गमावल्या. यानंतर जो रुट आणि जॉस बटलर यांनी चौथ्या विकेटसाठी 34 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी रवींद्र जडेजानं तोडली. जडेजानं रुटला (19 धावा) एलबीडब्ल्यू बाद केलं.

बटलरची अर्धशतकी खेळी : रुट बाद झाल्यानंतर बटलर आणि जेकब बेथेल यांनी मिळून पाचव्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली. अक्षर पटेलनं बटलरला बाद करुन ही भागीदारी संपुष्टात आणली. बटलरनं 67 चेंडूत चार चौकारांसह 52 धावांची सर्वोच्च धावसंख्या केली. त्यानंतर हर्षित राणानं लियाम लिव्हिंगस्टोन (5 धावा) आणि मोहम्मद शमीनं ब्रायडन कार्स (10 धावा) यांना बाद करून इंग्लंडची धावसंख्या 7 बाद 206 अशी केली. ब्रायडन कार्स बाद झाल्यानंतर काही वेळातच जेकब बेथेलनंही आपलं अर्धशतक पूर्ण केलं. मात्र बेथेललाही बटलरप्रमाणे आपला अर्धशतकी खेळ लांबवता आला नाही. बेथेलला रवींद्र जडेजानं एलबीडब्ल्यू आउट केलं. बेथेलनं 64 चेंडूत 51 धावा केल्या, ज्यात 3 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. बेथेलनंतर इंग्लंडनं आदिल रशीद (8) आणि साकिब महमूद (2) यांना स्वस्तात गमावले. अशाप्रकारे इंग्लंडचा संघ फक्त 47.4 षटकांत सर्वबाद झाला. भारताकडून पदार्पण करणाऱ्या हर्षित राणा आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमी, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

नागपूरच्या खेळपट्टी अहवाल : विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या या मैदानावर आतापर्यंत एकूण 09 वनडे सामने खेळले गेले आहेत. या ठिकाणी एका वेळी 45,000 प्रेक्षक बसू शकतात. विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवरील खेळपट्टी सामान्यतः फिरकी गोलंदाजांसाठी योग्य मानली जाते. तथापि, पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये या मैदानावरील तुटलेल्या खेळपट्टीवर उच्च धावसंख्येची स्पर्धा अपेक्षित आहे. मधल्या षटकांमध्ये चांगल्या धावा करणाऱ्या संघाला याचा फायदा होईल. नाणेफेक जिंकणारा संघ या विकेटवर लक्ष्याचा पाठलाग करु इच्छितो.

2019 मध्ये झाला होता शेवटचा वनडे :या मैदानावर शेवटचा वनडे सामना 2019 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला होता. या सामन्यात टीम इंडियानं ऑस्ट्रेलियन संघाचा 9 धावांनी पराभव केला. त्या सामन्यात भारताचा अव्वल फलंदाज विराट कोहलीनं शानदार शतक झळकावलं. अशा परिस्थितीत, चाहत्यांना या सामन्यातही कोहलीकडून शानदार खेळीची अपेक्षा असेल. त्या सामन्यात विराट सामनावीर होता. या मैदानावर आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज विराट कोहली आहे. त्यानं या मैदानावर 5 डावात 81.25 च्या सरासरीनं आणि 105.17 च्या स्ट्राईक रेटनं 325 धावा केल्या आहेत.

भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक (3 वनडे सामने) :

  • पहिला वनडे सामना : 06 फेब्रुवारी 2025, नागपूर (विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम)
  • दुसरा वनडे सामना : 09 ​​फेब्रुवारी 2025, कटक (बारबाती स्टेडियम)
  • तिसरा वनडे सामना : 12 जानेवारी 2025, अहमदाबाद (नरेंद्र मोदी स्टेडियम)

दोन्ही संघांची प्लेइंग 11 :

इंग्लंड : बेन डकेट, फिल साल्ट (यष्टीरक्षक), जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद.

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी.

हेही वाचा :

  1. Champions Trophy साठी संघात निवड झालेल्या खेळाडूची अचानक निवृत्ती; क्रिकेटविश्वात भूकंप
  2. अ‍ॅलेक्स 'रन मशीन' हेल्स... 'युनिव्हर्स बॉस'चा T20 विक्रम धोक्यात, दिग्गजांना टाकलं मागे
  3. दुपारी 2 वाजता संघात, संध्याकाळी 6 वाजता संघाबाहेर; चार तासांत स्टार खेळाडूसोबत काय घडलं?
Last Updated : Feb 6, 2025, 5:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details