नवी दिल्ली IND vs BAN T20I Series : भारतीय क्रिकेट संघ आणि बांगलादेश यांच्यात 19 सप्टेंबरपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. भारतीय संघाच्या कसोटी हंगामाची सुरुवात या मालिकेनं होणार आहे. या हंगामात भारतीय संघाला एकूण 10 कसोटी सामने खेळायचे आहेत. त्याचबरोबर भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेनंतर टी 20 मालिकाही खेळवली जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये 3 टी-20 सामने होणार आहेत. या मालिकेबाबत एक मोठं अपडेट समोर आले आहे. या मालिकेत भारतीय संघाच्या स्टार खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार आहे. गोलंदाज जसप्रित बुमराह आणि शुभमन गिल जो कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर खेळतो आणि संघातील महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे, यांना विश्रांती देण्यात येणार असल्याचं समोर आलंय.
टी 20 मालिकेत विश्रांती : बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघाला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यांनाही सामोरं जावं लागणार आहे. अशा परिस्थितीत, रिपोर्ट्सनुसार, वर्कलोड मॅनेजमेंट लक्षात घेता, शुभमन गिलला टी 20 मालिकेत विश्रांती दिली जाईल, कारण तो या हंगामात सर्व 10 कसोटी सामने खेळण्याची शक्यता आहे. कसोटी फॉर्मेटमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि यशस्वी जैस्वाल यांच्यासह गिल संघाच्या टॉप ऑर्डरमधील महत्त्वाचा खेळाडू आहे.