कानपूर IND vs BAN 2nd Test Day 1 : भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघ यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माच्या या निर्णयानं पुन्हा एकदा सर्व भारतीय चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. रोहित शर्मानं कर्णधार म्हणून अनेक वेळा आश्चर्यकारक निर्णय घेतले आहेत. हा निर्णयही त्यापैकीच एक आहे. ज्यानं 9 वर्ष जुना ट्रेंड तोडण्याचं काम केलं आहे. त्यामुळं भारतीय संघाची मानसिकता बदलण्याचं काम रोहित शर्मानं केल्याचं अधोरेखीत झालं आहे.
9 वर्षांनंतर एखाद्या कर्णधारानं केलं असं : जेव्हा रोहित शर्मानं बांगलादेशविरुद्ध नाणेफेक जिंकली तेव्हा या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करेल अशी सर्वांना अपेक्षा होती, पण रोहित शर्मानं उलट निर्णय घेत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय सर्वत्र चर्चेचा विषय ठरला. असं असलं तरी, 9 वर्षांनंतर एका भारतीय कर्णधारानं घरच्या मैदानावर नाणेफेक जिंकून कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुर्वी 14 नोव्हेंबर 2015 रोजी बेंगळुरु इथं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली होती. या सामन्यात विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार होता.