चेन्नई IND vs BAN 1st Test Day 2 : भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून (19 सप्टेंबर) चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सुरु झाला. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (20 सप्टेंबर) खेळ संपेपर्यंत भारतानं दुसऱ्या डावात 3 बाद 81 धावा केल्या होत्या. सध्या शुभमन गिल 33 आणि ऋषभ पंत 12 धावांवर नाबाद आहे. भारताची एकूण आघाडी 308 धावांची असून त्यांच्या सात विकेट शिल्लक आहेत.
भारताचं टॉप ऑर्डर पुन्हा अपयशी : भारतानं पहिल्या डावात 376 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ पहिल्या डावात 149 धावांत सर्वबाद झाला. अशा प्रकारे भारताला पहिल्या डावात 227 धावांची आघाडी मिळाली. यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या भारताला पहिला धक्का तिसऱ्याच षटकातच बसला, जेव्हा कर्णधार रोहित शर्मा वेगवान गोलंदाज तस्किन अहमदच्या चेंडूवर झाकीर हसनकरवी झेलबाद झाला. रोहितनं केवळ 5 धावा केल्या. यानंतर वेगवान गोलंदाज नाहिद राणाच्या चेंडूवर यशस्वी जैस्वाल यष्टिरक्षक लिटन दासकरवी झेलबाद झाली. त्यानंतर भारतानं 67 धावांवर विराट कोहलीचीही विकेट गमावली. फिरकी गोलंदाज मेहदी हसन मिराजच्या चेंडूवर कोहली एलबीडब्ल्यू आऊट झाला. कोहलीनं 37 चेंडूंचा सामना करत 17 धावा केल्या, ज्यात दोन चौकारांचा समावेश होता. यानंतर पंत आणि शुभमननं आणखी विकेट पडू दिली नाही.