महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

बांगलादेशकडून हिसकावला टी 20 विश्वचषक; आता 'या' देशात होणार स्पर्धा, आयपीएलचंही केलं होतं आयोजन - Womens T20 World Cup

ICC Women's T20 World Cup : बांगलादेशमध्ये गेल्या अनेक आठवड्यांपासून राजकीय निदर्शनं सुरु आहेत. ज्याचे अलीकडच्या काही दिवसांपासून हिंसाचारात रुपांतर झालं आहे. त्यामुळं देशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनाही बांगलादेश सोडून जावं लागलं आणि तेथील लष्करानं सत्तापालट करुन अंतरिम सरकार नेमलं आहे. त्यामुळं बांगलादेशातून टी 20 विश्वचषक हलवण्याची मागणी होत होती.

ICC Women's T20 World Cup
टी 20 विश्वचषक (Getty Images)

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 21, 2024, 10:16 AM IST

Updated : Aug 21, 2024, 10:56 AM IST

दुबई ICC Women's T20 World Cup : बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या राजकीय अस्थिरता आणि हिंसाचाराचा अखेर क्रिकेटवरही परिणाम झाला. आता या देशातून आयसीसीची मोठी स्पर्धा हिसकावण्यात आली आहे. महिला टी-20 विश्वचषक 3 ऑक्टोबरपासून बांगलादेशमध्ये होणार होता, पण आता तो संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये आयोजित केला जाणार आहे. आयसीसीनं मंगळवारी 20 ऑगस्ट रोजी हा मोठा बदल जाहीर केला. 3 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान 9वी महिला टी 20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे. यामध्ये भारत आणि यजमान बांगलादेशसह एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत.

हिंसाचारामुळं घेतला निर्णय : यापूर्वी ही स्पर्धा बांगलादेशमध्ये होणार होती आणि त्याची तयारी जवळपास पूर्ण झाली होती. त्यानंतर अचानक जुलै महिन्यात बांगलादेशात आरक्षणाबाबत सरकारच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु झालं, त्याचे हळूहळू हिंसक निदर्शनात रुपांतर झालं आणि त्यानंतर बांगलादेश लष्करानं पंतप्रधान हसिना यांना राजीनामा देण्याचा अल्टिमेटम दिला. हसीना यांनी त्यांच्या पदासह देश सोडला आणि तेव्हापासून संपूर्ण बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरुच आहे.

आयसीसीच्या बैठकीनंतर निर्णय :बांगलादेशातील हिंसाचारामुळं स्पर्धेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. यामुळं ही स्पर्धा भारत, यूएई आणि श्रीलंकेत आयोजीत करण्याच्या शक्यता तपासल्या जात होत्या, तर झिम्बाब्वेनंही या स्पर्धेचं आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ही स्पर्धा भारतात आयोजित करण्याची शक्यता नाकारली होती, त्यानंतर यूएईची शक्यता बळकट झाली. मंगळवार, 20 ऑगस्ट रोजी आयसीसीच्या आभासी मंडळाच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली आणि सर्वांनी त्याबद्दल चिंता व्यक्त केली. सध्याच्या परिस्थितीत बांगलादेशमध्ये विश्वचषक आयोजित करणं योग्य होणार नाही. स्पर्धेचं यजमान बांगलादेश क्रिकेट बोर्डानंही स्थळ बदलण्यास सहमती दर्शवली आणि यूएईमध्ये या स्पर्धेला मान्यता देण्यात आली. तथापि, हे स्पष्ट आहे की स्थळ बदलूनही, बांगलादेशी बोर्ड त्याचं अधिकृत यजमान राहील.

ऑस्ट्रेलियनं कर्णधारानं केली होती मागणी : अलीकडेच, गतविजेत्या ऑस्ट्रेलियाची कर्णधार आणि अनुभवी फलंदाज ॲलिसा हिलीनंही बांगलादेशमधील स्पर्धेच्या आयोजनावर टीका केली होती. अशा परिस्थितीत स्पर्धेचा भार बांगलादेशवर टाकणं योग्य होणार नाही आणि अशा वेळी तेथील संसाधनं स्थानिक लोकांकडून हिसकावून घेणं चुकीचे असल्याचं हीलीनं म्हटलं होतं. सध्याच्या परिस्थितीत बांगलादेशसमोर क्रिकेटपेक्षाही महत्त्वाचं आव्हान असल्याचंही तीनं म्हटलं होतं.

हेही वाचा :

  1. अरेच्चा... पाकिस्तानी स्टेडियम आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी योग्य नाहीत, पीसीबी प्रमुखांनीचं दिली जाहीर कबुली - champions trophy 2025
  2. राशिद खाननं ऑस्ट्रेलियाच्या 'या' स्पर्धेतून घेतली माघार, आयपीएल खेळणार का? - Rashid Khan
Last Updated : Aug 21, 2024, 10:56 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details