दुबई ICC Tournament : आयसीसीचं टूर्नामेंट आणि भारत-पाकिस्तान यांचा सामना नाही हे ऐकून थोडं विचित्र वाटतं. पण आश्चर्यचकित होऊ नका, कारण हे आता होणार आहे. आयसीसीनं एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. 2025 मध्ये महिला क्रिकेटचा 19 वर्षाखालील विश्वचषक होणार आहे. या स्पर्धेच्या गट टप्प्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकही सामना होणार नाही. आयसीसीनं दोन्ही संघांना वेगवेगळ्या गटात ठेवलं आहे. या निर्णयावर कोणाचाही विश्वास बसणार नाही, कारण दोन देशांत वर्षानुवर्षे सामने सुरु आहेत. चाहतेही या सामन्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत. आयसीसी प्रेक्षकसंख्या वाढवण्यासाठी याचा फायदा घेत प्रत्येक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवते. मात्र, यावेळी तसं होणार नाही.
16 संघ सहभागी सामोआचं पदार्पण : 19 वर्षाखालील महिला क्रिकेट विश्वचषक 18 जानेवारी 2025 पासून सुरु होणार आहे. ज्याचं आयोजन मलेशिया करेल. 2023 प्रमाणे यावेळीही 16 संघ सहभागी होणार आहेत. 18 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेत एकूण 41 सामने होणार आहेत. त्याचा अंतिम सामना 2 फेब्रुवारीला होणार आहे. सर्व संघ 13 ते 16 जानेवारी दरम्यान सराव सामने खेळतील. सामोआ संघ प्रथमच आयसीसी स्पर्धेत पदार्पण करणार आहे. याआधी समोआनं कोणत्याही वयोगटात आयसीसी स्पर्धा खेळलेली नाही. थायलंड आधी या स्पर्धेचे सह-होस्टिंग करणार होतं, परंतु नंतर आपलं नाव मागं घेतलं.
19 वर्षाखालील महिला क्रिकेट विश्वचषक (IANS Photo) भारत-पाकिस्तानच्या गटात कोण : या स्पर्धेत 16 संघांची 4 गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटात 4 संघ असतील. यावेळी गतविजेता भारत अ गटात असून वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि यजमान देश मलेशिया यांना त्यात स्थान देण्यात आलं आहे. तर फायनलमध्ये टीम इंडियाकडून पराभूत झालेला पाकिस्तान ब गटात आहे. या गटात इंग्लंड, आयर्लंड आणि अमेरिका या संघांचाही समावेश आहे. न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, सामोआ आणि आफ्रिकेतील एक पात्रता संघ सी गटात ठेवण्यात आला आहे. याशिवाय, डी गटात ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, स्कॉटलंड आणि आशियातील एक पात्रता संघ आहे. या स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी मलेशियातील 4 ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. अ गटातील भारताचे सर्व सामने सेलंगोर येथील ब्यूमास ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील. स्पर्धेचा अंतिम सामनाही याच मैदानावर होणार आहे. तर ग्रुप बी म्हणजेच पाकिस्तानचा सामना डॉ. हरजीत सिंग जोहर क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
19 वर्षाखालील महिला क्रिकेट विश्वचषक (IANS Photo) कोणत्या गटात कोणात संघ :
- अ गट - भारत, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि मलेशिया
- बी गट - इंग्लंड, पाकिस्तान, आयर्लंड आणि अमेरिका
- सी गट - न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, आफ्रिकन पात्रता संघ सामोआ
- डी गट - ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, आशियाई पात्रता संघ, स्कॉटलंड
हेही वाचा :
- किशनची 'शान'दार फलंदाजी, दोन षटकार मारत संघाला दिला विजय मिळवून, पाहा व्हिडिओ - jharkhand win
- 7 फलंदाज शुन्यावर बाद तरीही 'भारतीय महाराजा'च्या मदतीनं दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडिजला त्यांच्याच घरात हरवलं - WI vs SA 2nd Test