नवी दिल्ली ICC Champions Trophy 2025 : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या तयारीत व्यस्त आहे. ही ICC स्पर्धा पुढील वर्षाच्या सुरुवातीला खेळवली जाणार आहे. मात्र, भारतीय क्रिकेट संघाच्या सहभागाबाबत अद्याप परिस्थिती स्पष्ट झालेली नाही. 2008 पासून भारतीय क्रिकेट संघानं पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. अशा परिस्थितीत 2025 च्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला जाण्याची शक्यता नगण्य आहे. दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना पाकिस्तानबाहेर होऊ शकतो.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्याचं ठिकाण बदलेल : गेल्या काही काळापासून भारत आणि पाकिस्तानमधील संबंध चांगले नाहीत. त्यामुळं भारतीय संघ या देशाचा दौरा करत नाही. यामुळं, दोन्ही संघांमध्ये कोणतीही मालिका खेळली जात नाही, फक्त ICC स्पर्धा आणि आशिया चषक दरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये सामने खेळले जातात. टेलिग्राफच्या एका रिपोर्टनुसार, ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळवली जाऊ शकते. या स्पर्धेचा अंतिम सामना लाहोर इथं होणार आहे. पण जर भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचला तर फायनल मॅच पाकिस्तानबाहेर होईल, हा सामना दुबईत होण्याची शक्यता आहे.
आशिया चषकातही केला नव्हता दौरा : अशा परिस्थितीत, असं मानलं जात आहे की भारतीय संघ आपले सर्व ग्रुप स्टेजचे सामने पाकिस्तानबाहेर खेळेल आणि उपांत्य फेरीत पोहोचल्यानंतरही मैदानात बदल केले जातील. सध्या दोन्ही उपांत्य फेरीचे सामने पाकिस्तानमध्येच खेळले जाणार आहेत. आशिया कप 2023 चं यजमानपदही पाकिस्तानला मिळालं होतं. मात्र त्यानंतरही भारतीय संघानं पाकिस्तानचा दौरा केला नव्हता. ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये आयोजित करण्यात आली होती. भारतीय संघानं आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळले आणि अंतिम सामनाही तिथंच झाला. म्हणजे तोच फॉर्म्युला पुन्हा एकदा आजमावता येऊ शकतो.
29 वर्षांनंतर पाकिस्तानात ICC स्पर्धा : तब्बल 8 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीचं पुनरागमन होत आहे. त्याच वेळी, ही स्पर्धा गेल्या 29 वर्षांतील पाकिस्तानी भूमीवर ICC पहिली स्पर्धा आहे. ड्राफ्ट वेळापत्रकानुसार भारतीय संघाला आपले सर्व सामने लाहोरमध्ये खेळायचे आहेत. भारतीय संघ 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. यानंतर 23 फेब्रुवारीला न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना खेळणार आहेत. त्याच वेळी, भारत 1 मार्च रोजी स्पर्धेचे यजमान आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध गट टप्प्यातील तिसरा आणि शेवटचा सामना खेळेल. पण जर भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला नाही तर या सर्व सामन्यांच्या ठिकाणी बदल दिसू शकतात.
हेही वाचा :
- सचिन तेंडुलकर पुन्हा दिसणार भारतीय जर्सीत... कोणत्या लीगमध्ये करणार भारताचं नेतृत्व? वाचा A टू Z माहिती