मुंबई How To Buy IND vs NZ 3rd Test Match Tickets : भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांची कसोटी मालिका 16 ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. या दोन्ही संघांमधील मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना 01 नोव्हेंबरपासून मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियनवर सुरु होत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 2021 मध्ये भारतीय संघ आणि न्यूझीलंड यांच्यात शेवटची कसोटी खेळली गेली होती. आता तीन वर्षाच्या कालावधीनंतर या मैदानावर कसोटी सामना रंगणार असून, तमाम क्रिकेटप्रेमी आगामी सामन्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात मुंबईत होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही तिकिटे कशी खरेदी करावी? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तर याचं उत्तर या बातमीत मिळेल.
69 वर्षांनी पहिला मालिका विजय :न्यूझीलंड क्रिकेट संघ 1955 पासून भारत दौऱ्यावर येत आहे. परंतु त्यांनी भारतात कधीही कसोटी मालिका जिंकलेली नव्हती. मात्र आता काळ बदलला आहे. टॉम लॅथमच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडच्या युवा संघानं 69 वर्षांचा दुष्काळ संपवून इतिहास रचला आहे. 69 वर्षांनंतर पहिल्यांदाच कीवी संघानं भारतातच कसोटी मालिकेत भारताचा पराभव केला आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडनं 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. त्यामुळं आता भारतावर घरच्या मैदानावर प्रथमच क्लीन स्वीपचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळं या सामन्यात भारतीय संघ विजय मिळवत प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न करेल, तर दुसरीकडे कीवी संघही हा सामना जिंकत महापराक्रम करण्याचा प्रयत्न करेल. अशा परिस्थितीत हा सामना निर्णायक होण्याची शक्यता आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेचं वेळापत्रक :
- पहिली कसोटी - 16 ते 20 ऑक्टोबर (न्यूझीलंड 8 विकेटनं विजयी)
- दुसरी कसोटी - 24 ते 28 ऑक्टोबर (न्यूझीलंड 113 धावांनी विजयी)
- तिसरी कसोटी - 1 ते 5 नोव्हेंबर (वानखेडे स्टेडियम, मुंबई)
किती रुपये आहे तिकिटाची किंमत : भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या कसोटी सामन्याच्या सीझन तिकिटांची किंमत 375 रुपयांपासून सुरु होईल आणि स्टँडनुसार किंमत 25000 रुपयांपर्यंत जाईल. याव्यतिरिक्त, चाहत्यांना प्रत्येक दिवसासाठी स्वतंत्र तिकिटं खरेदी करण्याचा पर्याय देखील असेल. ही किंमत एका महिन्याच्या मोबाईल रिचार्जपेक्षाही कमी दरात आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबई इथं होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याची तिकिटं insider या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसंच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अधिकृत वेबसाइटवर तिकिटं उपलब्ध असतील. तर ऑफलाइन तिकीट उपलब्धतेबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही.