कराची Tickets For Champions Trophy : क्रिकेट चाहते चॅम्पियन्स ट्रॉफीची आतुरतेनं वाट पाहत आहेत. याचं आयोजन पाकिस्तान करत आहे, ज्यात भारतीय क्रिकेट संघाचे सर्व सामने दुबईमध्ये होतील, कारण बीसीसीआयनं भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला होता. यानंतर, या स्पर्धेत हायब्रिड मॉडेलचा फॉर्म्युला स्वीकारण्यात आला. चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. आता, याआधीही, तिकिटांच्या किमती उघड झाल्या आहेत, ज्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं सर्वात स्वस्त तिकीट 1000 पाकिस्तानी रुपयांमध्ये ठेवले आहे. हे भारतीय चलनात अंदाजे 310 रुपयांच्या समतुल्य असेल. म्हणजेच पाकिस्ताननं ठरवलेला तिकिटाचा दर भारतातील 1 किलो पनीरच्या किमतीपेक्षा कमी आहे. भारतात 1 किलो पनीर अंदाजे 400 रुपयांना मिळते.
सर्वात स्वस्त तिकीट 1000 पाकिस्तानी रुपयांना : पीटीआयनं दिलेल्या अहवालानुसार, पीसीबीनं कराची, लाहोर आणि रावळपिंडी इथं होणाऱ्या सामन्यांसाठी तिकिटांची किमान किंमत 1000 पाकिस्तानी रुपये ठेवली आहे. रावळपिंडी इथं होणाऱ्या पाकिस्तान आणि बांगलादेश सामन्यांच्या तिकिटांची किंमत 2000 पाकिस्तानी रुपये (अंदाजे 620 भारतीय रुपये) आणि उपांत्य फेरीच्या तिकिटांची किंमत 2500 पाकिस्तानी रुपये (अंदाजे 776 भारतीय रुपये) असेल.
व्हीव्हीआयपी तिकिटाची किंमत किती :पीसीबीनं सर्व सामन्यांसाठी व्हीव्हीआयपी तिकिटांची किंमत 12000 पाकिस्तानी रुपये (अंदाजे 3726 भारतीय रुपये) ठेवली आहे. परंतु उपांत्य फेरीसाठी ती 25000 (अंदाजे 7764 भारतीय रुपये) असेल. पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सामन्यासाठी कराचीमध्ये प्रीमियर स्टँड तिकिटाची किंमत 3500 पाकिस्तानी रुपये (अंदाजे 1086 भारतीय रुपये), लाहोरमध्ये 5000 (अंदाजे 1550 भारतीय रुपये) आणि रावळपिंडीमध्ये 7000 (अंदाजे 2170 भारतीय रुपये) आहे. तसंच पीसीबी कराचीमध्ये व्हीआयपी स्टँड तिकिटांची किंमत 7000 रुपये, लाहोरमध्ये 7500 रुपये आणि बांगलादेश सामन्यासाठी 12500 रुपये ठेवू इच्छित आहे.