महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

हा कसला आंतरराष्ट्रीय सामना... फक्त 10 चेंडू अन् खेळ खल्लास; हे कसं झालं भावा? - T20 Cricket - T20 CRICKET

T20 Cricket : हाँगकाँगनं 110 चेंडू शिल्लक असतानाच लक्ष्य गाठलं. आंतरराष्ट्रीय टी 20 मधील चेंडूंच्या बाबतीत हा तिसरा सर्वात मोठा विजय ठरला. सध्या या सामन्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

T20 Cricket
फक्त 10 चेंडूत खेळ खल्लास (IANS Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 31, 2024, 6:54 PM IST

क्वालालंपूर T20 Cricket : हाँगकाँग क्रिकेट संघानं अविश्वसनीय कामगिरी केली आहे. ICC पुरुष टी 20 विश्वचषक आशिया पात्रता स्पर्धेच्या सामन्यात हाँगकाँगनं मंगोलियावर 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. आश्चर्याची बाब म्हणजे हाँगकाँगनं हे लक्ष्य अवघ्या 10 चेंडूत पूर्ण केलं. या सामन्यात हाँगकाँगसमोर विजयासाठी 18 धावांचं लक्ष्य होतं.

मंगोलियाचा संघ 17 धावांत सर्वबाद : ब्युमास ओव्हल, क्वालालंपूर इथं 31 ऑगस्ट (शनिवार) रोजी झालेल्या या सामन्यात हाँगकाँगनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हाँगकाँगचा हा निर्णय अगदी योग्य ठरला. मंगोलियाचा संघ अवघ्या 14.2 षटकांत 17 धावांत गडगडला. विशेष म्हणजे एकाही मंगोलियन फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. मंगोलियाकडून मोहन विवेकानंदननं 18 चेंडूत सर्वाधिक 5 धावा केल्या. तर लुवसंजुंडुई एर्डनबुलगन, दावसुरेन जामियनसुरेन आणि गंडेम्बेरेल गॅम्बोल्ड यांनी प्रत्येकी दोन धावा केल्या.

भारतीय गोलंदाजानं रचला इतिहास :हाँगकाँगकडून एहसान खाननं पाच धावांत चार बळी घेतले. तर अनस खान आणि यासीम मुर्तझा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. मात्र, या सगळ्यात वेगवान गोलंदाज आयुष शुक्लानं 4 षटकांत एकही धाव न देता एक विकेट घेतली. भारतीय वंशाचा आयुष शुक्ला आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये त्याची चारही षटकं मेडन टाकणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी केवळ साद बिन जफर (कॅनडा) आणि लॉकी फर्ग्युसन (न्यूझीलंड) यांनी हा कारनामा केला आहे.

याआधी दोघांनी केला पराक्रम :2021 साली कूलिज इथं झालेल्या टी 20 विश्वचषक अमेरिका क्षेत्र पात्रता सामन्यात साद जफरनं पनामाविरुद्ध 4-4-0-2 असा स्पेल टाकला. तर लॉकीनं टी 20 विश्वचषक 2024 मध्ये पापुआ न्यू गिनीविरुद्ध ही कामगिरी केली होती. पापुआ न्यू गिनीविरुद्ध, लॉकीनं 4-4-0-3 अशा अविश्वसनीय कामगिरीसह सामना संपवला. या सामन्यात झीशान अली 15 धावांवर नाबाद तर कर्णधार निझाकत खान हाँगकाँगसाठी 1 धावेवर नाबाद माघारी परतला. जेमी ऍटकिन्सन (2) हा एकमेव फलंदाज बाद झाला. हाँगकाँगचा संघही काही वेळा आशिया कपमध्ये सहभागी झाला आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या खेळाडूंना मोठ्या संघांविरुद्ध खेळण्याचा अनुभव आहे.

हाँगकाँगनं केला विक्रम :हाँगकाँगनं 110 चेंडू शिल्लक असतानाच लक्ष्य गाठलं. आंतरराष्ट्रीय टी 20 मधील चेंडूंच्या बाबतीत हा तिसरा सर्वात मोठा विजय ठरला. या बाबतीत, स्पॅनिश संघ आघाडीवर आहे, ज्यानं 118 चेंडू शिल्लक असताना आयल ऑफ मॅनचा पराभव केला होता. 2023 साली स्पेन आणि आयल ऑफ मॅन यांच्यातील टी 20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला होता. जपानचा संघ या यादीत दुस-या स्थानावर आहे, त्यांनी यावर्षी मे महिन्यात मंगोलियाविरुद्ध 112 चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला होता.

हेही वाचा :

  1. 6,6,6,6,6,6... एका षटकात मारले सहा षटकार; भारताला मिळाला दूसरा 'युवराज सिंग', पाहा व्हिडिओ - Delhi Premier League 2024
  2. विराट कोहलीकडे आहेत महागडी घड्याळं; किंमत बघून डोळे होतील पांढरे - Virat Kohli

ABOUT THE AUTHOR

...view details