दुबई Hardik Pandya No 1 All Ronder :भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानं भारताला यावर्षी T20 विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तेव्हापासून, तो गोलंदाजी आणि फलंदाजीत T20 क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. अलीकडेच, हार्दिक पांड्यानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही चांगली कामगिरी केली, त्याचा फायदा त्याला ICC क्रमवारीत झाला. हार्दिक पांड्या आता ICC क्रमवारीत नंबर 1 T20 अष्टपैलू खेळाडू बनला आहे. पांड्यानं 2 स्थानांनी झेप घेत हा मोठा टप्पा गाठला. भारतीय अष्टपैलू खेळाडूनं इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोनकडून अव्वल स्थान हिसकावून घेतलं.
दुसऱ्यांदा पटकावलं अव्वल स्थान : हार्दिक पांड्यानं 2024 मध्ये दुसऱ्यांदा ICC पुरुषांच्या T20I अष्टपैलू रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. यावरुन तो या फॉरमॅटमध्ये भारतीय संघासाठी किती महत्त्वाचा आहे याचा अंदाज लावला जाऊ शकतो. या वर्षी हार्दिकनं T20I क्रिकेटमध्ये 352 धावा केल्या आहेत. याशिवाय त्यानं यावर्षी 16 विकेट्सही आपल्या नावावर केल्या आहेत. हार्दिकनं दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर शेवटच्या T20I सामन्यात गोलंदाजीत अप्रतिम कामगिरी केली होती. त्यानं 3 षटकांत केवळ 8 धावा देत 1 बळी घेण्याचा महान पराक्रम केला होता. यादरम्यान त्यानं एक मेडन ओव्हरही टाकला होता.