मुंबई Happy Birthday Chris Gayle : वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू आणि क्रिकेटमध्ये 'युनिव्हर्स बॉस' म्हणून प्रसिद्ध असलेला ख्रिस गेल आज त्याचा 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. ख्रिस गेलला समोर पाहून चांगले गोलंदाज आपली लाईन आणि लेन्थ विसरायचे. वेस्ट इंडिजच्या या धडाकेबाज फलंदाजाचा जन्म 21 सप्टेंबर 1979 रोजी किंग्स्टन, जमैका इथं झाला. ख्रिस गेलनं वेस्ट इंडिजसाठी 483 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि यादरम्यान त्यानं संघाला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत.
ख्रिस गेलनं क्रिकेटवर सोडली छाप : ख्रिस गेलनं आपल्या क्रिकेट कारकिर्दीत सर्व फॉरमॅटमध्ये अनेक विक्रम केले. ज्यामध्ये कसोटीतील त्रिशतक, वनडेतील द्विशतक आणि T20 मधील अनेक शतकांचा समावेश आहे. क्रिकेटच्या मैदानावर गेलची कामगिरी अगणित आहे. ख्रिस गेल हा वेस्ट इंडिजसाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू आहे. T20 फॉरमॅटबद्दल बोलायचं झालं तर गेलनं या फॉरमॅटमध्ये 14,000 हून अधिक धावा केल्या आहेत आणि 1,000 हून अधिक षटकार ठोकले आहेत. जगातील अशी कोणतीही T20 लीग नसेल ज्यात गेल खेळला नाही.
1000 हून अधिक षटकार : T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. ख्रिस गेलनं वेगवेगळ्या लीग आणि आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये जवळपास 15 हजार धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 1000 हून अधिक षटकार आहेत, तर टी-20मध्ये 22 शतकं आहेत. ख्रिस गेलनं आयपीएलमध्येही अनेक विक्रमी खेळी केल्या आहेत.