मुंबई Vinod Kambli : भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओत विनोद कांबळीला चालताना त्रास होत असल्याचं स्पष्ट दिसत होतं. चालण्यासाठी दोन व्यक्ती त्याच्या हाताला धरून मदत करत होते. आपल्या दमदार फलंदाजीनं गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या विनोदची अशी अवस्था पाहून क्रिकेट चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात होती. या व्हायरल व्हिडिओनंतर विनोद कांबळीचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. त्यामध्ये त्यानं त्याच्या प्रकृतीबाबत स्पष्टीकरण दिलय.
मी एकदम फिट : विनोद कांबळीचे मित्र रीकी कोटो तसंच प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पंच मार्कस कोटो यांनी नुकतीच विनोद कांबळीची त्याच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी विनोद कांबळीशी संवाद साधला. यावेळी विनोद कांबळी म्हणला की, "मी एकदम फिट आहे. मी आजही तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करु शकतो. फिरकीपटूंचे चेंडू आजही मैदानाबाहेर पाठवू शकतो." विनोदने आपल्या अनेक मित्रांशी संपर्क साधून गप्पा मारल्या, असं रीकी कोटो यांनी सांगितलं. विनोद कांबळीच्या या प्रतिक्रियेमुळे आता त्याच्याबाबतच्या तर्क-वितर्कांना आणि विवादांना पूर्णविराम मिळाला आहे.