शिर्डी : श्रद्धा-सबुरीचा महामंत्र देणारे शिर्डी साईबाबा (Shirdi Saibaba) पक्षी, प्राण्यांसह वृक्षांवरदेखील प्रेम करत त्यांचा सांभाळ करायचे. त्या काळी साईबाबांनी फुलवलेली बाग आजही मंदिर परिसरात आहे. त्या बागेला 'लेंडीबाग' म्हणून संबोधलं जातं. तर शिर्डी साईबाबांनी दिलेला पर्यावरणाचा संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याकरिता साईमंदिर संस्थाननं महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे.
भाविकांनाही आध्यात्मिकबरोबर नैसर्गिक अनुभूतीचा संगम साई मंदिर परिसरात अनुभवता येणार आहे. कारण, साईबाबा मंदिर परिसरात विविध प्रकारच्या सातशेहून अधिक रोपांची लागवड करण्यात आली आहे.
विविध झाडांच्या रोपांची लागवड : या संदर्भात अधिक माहिती देत साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर म्हणाले की, "साई मंदिर परिसरात विविध जातींच्या तब्बल सातशेहून अधिक रंगीबेरंगी फुलांच्या झाडांसह नारळ, केळी, अशा अनेक झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. पुणे येथील एका नर्सरीमधून फुलांच्या रोपांसह विविध फळांची रोपं मागवण्यात आली होती. काही फुलांच्या रोपांसह कुंड्या भाविकांनी देणगी म्हणून दिल्या आहेत. तर काही कुंड्या आणि फळा, फुलांचे रोप साईबाबा संस्थानच्या वतीनं खरेदी करण्यात आले आहेत."
'झाडे लावा, झाडे जगवा' : "सकाळच्या आणि संध्याकाळच्या आरती दरम्यान या फुलांच्या सुगंधामुळं मंदिर परिसरात एक अद्वितीय आध्यात्मिक वातावरण तयार होत आहे. 'झाडे लावा झाडे जगवा' याच बरोबर साईंनी दिलेल्या पर्यावरणाच्या संदेशाची आठवणही मंदिर परिसरात आल्यानंतर भाविकांना होत आहे", असंही गाडीलकर यांनी सांगितलं. दरम्यान, मंदिर परिसरात वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांमुळे वातावरण प्रफुल्लित झाल्याचं दिसत आहे. विविध रंगांच्या सुगंधी आणि टवटवीत फुलांनी संपूर्ण मंदिर परिसर अधिकच सुंदर दिसत आहे. या फुलांच्या सुवासानं संपूर्ण वातावरण प्रसन्न आणि भक्तिमय झालं आहे.
हेही वाचा -