दुबई Fighting in Live Cricket Match : क्रिकेटला नेहमीच जेंटमॅनचा खेळ म्हटलं जातं. मात्र क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा खेळाडूंमध्ये जोरदार वाद होत असतात. खेळाडूंमध्ये शाब्दिक युद्ध होणं सामान्य आहे. पण सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओनं प्रत्येक क्रिकेट चाहत्याला आश्चर्याचा धक्का दिला आहे. खरं तर, या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की खेळाडूंमधील वाद इतका टोकाला गेला की ते हाणामारीपर्यंत पोहोचले. मैदानाच्या मध्यभागी खेळाडू चक्क एकमेकांना लाथा मारताना आणि मुक्का मारताना दिसले.
थेट सामन्यात लाथा बुक्क्यांनी जोरदार मारहाण : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ MCC वीकडे बॅश XIX लीगचा आहे. ही क्रिकेट लीग UAE (संयुक्त अरब अमिराती) मध्ये खेळवली जाते. या लीगदरम्यान एरोविसा क्रिकेट आणि रबदान क्रिकेट क्लब यांच्यात सामना झाला. या सामन्यादरम्यान दोन्ही संघांच्या खेळाडूंनी सर्व मर्यादा ओलांडल्या. खरं तर, सामन्यादरम्यान एरोविसा क्रिकेट संघाच्या गोलंदाजानं रबदान संघाच्या फलंदाजाला बाद केल्यानंतर जोरदार जल्लोष केला. गोलंदाजाचं असे सेलिब्रेशन करताना पाहून बॅट्समनचा क्रीजवरच संयम सुटला. त्यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली. दोन्ही खेळाडू क्रीजवरच एकमेकांना मारताना दिसले. यादरम्यान दोघंही जमिनीवर कोसळले. यानंतर संघातील सहकारी आणि पंचांनी दोन्ही खेळाडूंना वेगळं करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.