बर्मिंगहॅम Ben Stokes Record : वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटीच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडनं 10 गडी राखून सामना जिंकला. हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला चौथ्या डावात 82 धावांची गरज होती. ज्या त्यांनी बॅझबॉल शैलीत केवळ 7.2 षटकांत एकही विकेट न गमावता पूर्ण केल्या. यासह इंग्लंडनं वेस्ट इंडिजविरुद्धची 3 सामन्यांची कसोटी मालिका 3-0 अशी जिंकली. चौथ्या डावात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सनं अवघ्या 28 चेंडूत 57 धावा केल्या आणि बेन डकेटनं 16 चेंडूत 25 धावांची नाबाद खेळी करत इंग्लंडला 10 विकेट्सनं सहज विजय मिळवून दिला.
इंग्लंडसाठी कसोटीत सर्वात वेगवान अर्धशतक : या सामन्यात बेन स्टोक्सनं इतिहास रचत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. त्यानं इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतक झळकावलं. इंग्लंडसाठी यापुर्वी इयान बोथामनं सर्वात जलद अर्धशतक केलं होतं. त्यानं 1981 मध्ये दिल्लीत भारताविरुद्ध खेळताना 28 चेंडूत हा करानामा केला होता. स्टोक्सनं हे अर्धशतक अवघ्या 24 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं पूर्ण केलं. त्याला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचीही संधी होती. मात्र त्याला हा विक्रम मोडता आला नाही. कसोटी क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतक पाकिस्तानचा माजी कर्णधार मिसबाह-उल-हकच्या नावावर आहे. त्यानं 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या 21 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं.