नॉटिंगहॅम Fastest Team Fifty in Test : वेस्ट इंडिजविरुद्धची पहिली कसोटी एकतर्फी जिंकल्यानंतर आता इंग्लंड संघानं एक मोठा विक्रम केला आहे. नॉटिंगहॅम कसोटीत इंग्लंडच्या फलंदाजांनी असा विक्रम केला जो कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात प्रथमच घडला. इंग्लंड संघानं वेस्ट इंडिजविरुद्ध केवळ 4.2 षटकांत 50 धावांचा टप्पा पार केला. जो एक विश्वविक्रम आहे. यापूर्वी हा विक्रम केवळ इंग्लंडच्या नावावर होता. या संघानं 1994 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4.3 षटकांत पन्नासचा टप्पा ओलांडला होता, पण आता 30 वर्षांनंतर या संघानं स्वतःचा विक्रम मोडीत काढला आहे.
डकेटच्या फटकेबाजीनं रेकॉर्ड केला : नॉटिंगहॅम कसोटीत इंग्लंडची सुरुवात खूपच खराब झाली होती. डावाच्या पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर या संघानं पहिली विकेट गमावली. सलामीवीर झॅक क्राउली 0 धावांवर बाद झाला. पण त्यानंतर ऑली पोपसह बेन डकेटनं पुढच्या 23 चेंडूत संघाची धावसंख्या पन्नासच्या पुढं नेली. बेन डकेटनं केवळ 32 चेंडूत स्वतःचही अर्धशतक पूर्ण केलं जे त्याचं सर्वात वेगवान कसोटी अर्धशतक आहे. आक्रमक फलंदाजी करत या खेळाडूनं ऑली पोपसोबत 106 धावांची भागीदारी केली. बेन डकेट 59 चेंडूत 71 धावा करुन बाद झाला. त्याची विकेट शमर जोसेफनं घेतली. डकेटच्या बॅटमधून एकूण 14 चौकार आले.