कोलकाता 12000 Runs in T20 :भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघातील 5 सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला T20 सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर झाला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर कर्णधार जॉस बटलरनं इंग्लंडसाठी एक आक्रमक अर्धशतक झळकावलं आणि त्याच्यामुळंच इंग्लिश संघ 132 धावा करु शकला. इंग्लंडचे उर्वरित फलंदाज मात्र अपयशी ठरले.
बटलर दिग्गज खेळाडूंच्या यादीत : इंग्लिश कर्णधार जॉस बटलरनं सामन्यात शानदार फलंदाजी केली आणि एक उत्तम अर्धशतक झळकावलं. त्यानं 68 धावा केल्या, ज्यात 8 चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. या सामन्यात त्यानं 33वी धाव घेताच त्यानं T20 क्रिकेटमध्ये 12000 धावा पूर्ण केल्या. यासह तो T20 क्रिकेटमध्ये 12000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा एकूण सातवा फलंदाज ठरला. त्याच्या आधी ख्रिस गेल, शोएब मलिक, किरॉन पोलार्ड, अॅलेक्स हेल्स, विराट कोहली, डेव्हिड वॉर्नर यांनी T20 क्रिकेटमध्ये 12000 हून अधिक धावा केल्या आहेत. तसंच बटलर हा T20 क्रिकेटमध्ये 12000 धावा पूर्ण करणारा इंग्लंडचा दुसरा फलंदाज ठरला. त्याच्या आधी अॅलेक्स हेल्सनं हा कारनामा केला आहे.