लंडन Ben Stokes Surgery :इंग्लंडचा क्रिकेट संघ गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेला होता. या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळं त्याला रुग्णालयात जाऊन मोठी शस्त्रक्रिया करावी लागली. याबाबत त्यानं सोशल मीडियावर एक नवीन माहिती दिली आहे. स्टोक्सनं शस्त्रक्रियेनंतर त्याच्या पायाचा एक फोटो शेअर केला, ज्यात तो ब्रेस घातलेला दिसत आहे. तो गाडीत आहे आणि पायाखाली उशीही ठेवली आहे. चित्र पाहून असं म्हणता येईल की दुखापत गंभीर होती, त्यासाठी मोठं ऑपरेशन करावं लागलं. आता तो मैदानात परत कधी येणार, असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे.
स्टोक्स कधी करणार पुनरागमन :शस्त्रक्रियेनंतर बेन स्टोक्सच्या पायात बसवलेलं मशीन पाहिल्यानंतर तो किती दिवस मैदानाबाहेर राहणार हा प्रश्न आणखी गडद झाला. अहवालानुसार, त्याला पूर्णपणे बरं होण्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी लागेल. मात्र, लवकरच तो ॲक्शनमध्ये दिसणार असल्याचे संकेत त्यानं आपल्या पोस्टमध्ये दिले आहेत. इंग्लंडच्या कर्णधारानं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, 'शस्त्रक्रिया झाली आहे. म्हणूनच मी काही दिवसांसाठी बायोनिक माणूस झालो आहे. लवकरच परत येईल.' त्याच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी त्याच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.