अँटिग्वा (वेस्ट इंडिज) ENG Beat WI in 2nd ODI : वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असलेल्या इंग्लंड क्रिेकेट संघानं यजमान संघावर दणदणीत विजय नोंदवला आहे. सध्या इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंड संघाला 8 विकेटनं पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. मात्र त्यांनी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दमदार पुनरागमन केलं आणि इंग्लंडनं हा सामना 5 विकेटनं जिंकला. या सामन्यात संघाचा कर्णधार लियाम लिव्हिंग्स्टननं शानदार शतक झळकावलं. त्याच्या शतकामुळं त्याच्या संघानं 15 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. या सामन्यातील विजयासह त्याच्या संघानं तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या मालिकेतील पुढील सामना 06 नोव्हेंबर रोजी होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ मालिका जिंकेल.
शाई होपनं खेळली शतकी खेळी : या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांचा हा निर्णय योग्य ठरला. अवघ्या 12 धावांवर वेस्ट इंडिज संघाचे दोन प्रमुख फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. यानंतर कर्णधार शाई होप आणि केसी कार्टर यांनी मिळून डावाची धुरा सांभाळली आणि इंग्लंडच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी 143 धावांची भागीदारी केली. कार्टर 77 चेंडूत 71 धावा करुन बाद झाला. तो बाद झाल्यानंतर होपनं आपलं शतक पूर्ण केलं. त्यानंतर तो 117 धावा करुन बाद झाला. जोफ्रा आर्चरनं त्याची विकेट घेतली. शेरफेन रदरफोर्डनं 36 चेंडूत 54 धावांची शानदार खेळी केली. या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजनं 50 षटकं खेळून 6 बाद 328 धावा करण्यात यश मिळवलं. इंग्लंडकडून आदिल रशीदनं सर्वाधिक 2 बळी घेतले. विशेष म्हणजे इंग्लंडनं या डावात 9 गोलंदाजांचा वापर केला होता.