नवी दिल्ली Sachin Tendulkar Played for Pakistan : सचिन तेंडुलकरचं नाव ऐकलं नसेल असं जगात कोणी नाही. सचिन हा क्रिकेट जगतातील एक महान खेळाडू आहे जो आपल्या फलंदाजीनं प्रतिस्पर्धी गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडत असे. सचिननं क्रिकेटमध्ये इतके विक्रम केले आहेत की, असा एकही विक्रम नाही जो सचिननं केला नसेल. त्या विक्रमांची आजही क्रिकेट इतिहासाच्या पानात नोंद आहे.
सचिनच्या नावावर अनेक विक्रम : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा जगातील एकमेव फलंदाज होण्यापासून ते 100 शतकं झळकावणारा एकमेव क्रिकेटपटू होण्यापर्यंत अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. पण सचिन तेंडुलकरबद्दल एक गोष्ट आहे जी अनेकांना माहीत नाही. भारतीय संघात पदार्पण करण्यापूर्वी सचिननं पाकिस्तान संघाकडून एक सामना खेळला होता. हे आश्चर्यकारक असलं तरी हे खरं आहे.
पाकिस्तानकडून खेळला सचिन : सचिन तेंडुलकरनं वयाच्या 16 व्या वर्षी म्हणजेच 1989 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र याआधी तो वयाच्या 13व्या वर्षी पाकिस्तान संघात खेळला होता. 1987 मध्ये, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (CCI) च्या सुवर्ण महोत्सवाचा एक भाग म्हणून, दोन्ही संघांमध्ये मैत्रीपूर्ण सामना म्हणून कसोटी आणि एकदिवसीय मालिका आयोजित करण्यात आली होती. यासाठी भारत दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघानं 20 जानेवारी रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर भारतासोबत सराव सामना खेळला होता. मात्र लंच ब्रेकमुळं पाकिस्तानचे दिग्गज खेळाडू जावेद मियांदाद आणि अब्दुल कादिर जेवणासाठी हॉटेलमध्ये गेले. सामना सुरु असतानाही ते मैदानात परतले नाही. त्यामुळं पाकिस्तानला क्षेत्ररक्षकांच्या कमतरतेचा सामना करावा लागला. अशा वेळी पाकिस्तानचा कर्णधार इम्रान खाननं भारताचा एखादा बदली खेळाडू बदली खेळाडू म्हणून पाठवण्याची विनंती केली. यावेळी सीमारेषेजवळ असलेल्या सचिनला पाकिस्तानकडून क्षेत्ररक्षणासाठी मैदानात पाठवण्यात आलं.
25 मिनिटांपर्यंत केलं क्षेत्ररक्षण : सचिननं पाकिस्तानकडून 25 मिनिटं क्षेत्ररक्षण केलं. सचिन लाँग ऑनवर क्षेत्ररक्षण करत असताना भारताच्या विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार कपिल देवनं सचिनजवळ चेंडू मारला पण सचिनला चेंडू पकडण्यात अपयश आलं. याचा उल्लेख खुद्द सचिन तेंडुलकरनं त्याच्या 'प्लेइंग इट माय वे' या आत्मचरित्रात केला आहे.
हेही वाचा :
- ना दुबई, ना लंडन... 'या' शहरात पहिल्यांदाच होणार IPL 2025 मेगा लिलाव, तारीखही ठरली; BCCI चा मोठा निर्णय
- 'गोलंदाज' कागिसो रबाडाचं कसोटीत वेगवान त्रिशतक; बांगलादेशविरुद्ध रचला इतिहास