लंडन Dawid Malan : इंग्लंड क्रिकेट संघाचा स्फोटक आणि टी 20 आंरराष्ट्रीयमधील नंबर-1 फलंदाज डेव्हिड मलान यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. त्यानं वयाच्या 37 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. हा डावखुरा फलंदाज इंग्लंडकडून तिन्ही फॉरमॅट खेळला आहे. मलान अखेरचा नोव्हेंबर 2023 मध्ये इंग्लंडकडून खेळताना दिसला होता. अलीकडेच तो इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या पुरुषांच्या 'द हंड्रेड' स्पर्धेचाही भाग होता. तो या स्पर्धेत ओवल इन्विंसिबल संघाचा एक भाग होता, जो विजेता ठरला.
डेव्हिड मलानचा विश्वविक्रम :डेव्हिड मलान हा एकदिवसीय आणि टी 20 फॉरमॅटमधील एक विशेष फलंदाज होता. विशेषत: टी-20 क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी अप्रतिम होती. मलाननं 62 टी 20 सामन्यांमध्ये 36.38 च्या सरासरीनं 1892 धावा केल्या आणि या खेळाडूनं दीर्घकाळ आयसीसी टी 20 क्रमवारीत अव्वल स्थान राखलं. टी 20 क्रमवारीत 900 पेक्षा जास्त रेटिंग पॉइंट्स मिळविणारा मालन हा जगातील एकमेव फलंदाज होता. विराट कोहलीनंही टी 20 क्रमवारीत दीर्घकाळ अव्वल स्थान राखलं होतं पण त्याचं सर्वोच्च रेटिंग 897 होते.