मुंबई Indian Cricket Team on Dussehra : भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघ यांच्यात 3 सामन्यांची T20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत भारतीय संघानं पहिले दोन सामने जिंकून अजेय आघाडी घेतली आहे. आता भारतीय संघातील खेळाडू क्लीन स्वीपवर लक्ष ठेवून आहेत. त्याचबरोबर बांगलादेशला सलग दुसऱ्या मालिकेत क्लीन स्वीपचा धोका आहे. भारतीय संघानं यापूर्वी कसोटी मालिकेतही बांगलादेशचा 2-0 असा पराभव केला होता. दोन्ही संघांमधील T20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज 12 ऑक्टोबर रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे.
दसऱ्याच्या दिवशी भारताची कामगिरी कशी : विशेष म्हणजे आज दसरा आहे. दसरा हा विजयाचा प्रतिक मानला जातो. रामायणानुसार दसरा साजरा करण्याचं मुख्य कारण म्हणजे भगवान रामानं रावणावर विजय मिळविल्याचं स्मरण म्हणून हा सण साजरा केला जातो. अयोध्येचा राजा असलेल्या भगवान रामांची पत्नी सीतेचं रावणानं अपहरण केलं होतं. भगवान रामानं रावणाला युद्धात पराभूत करुन सीतेची सुटका केली होती. आजच्या तिथीला रावणाचा रामानं वध केला होता. भारतीय क्रिकेट संघानं दसऱ्याच्या दिवशी 2000 सालापासून आतापर्यंत सहा एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात दोन सामने जिंकले आहेत, दोन सामने हरले आहेत तर 2 सामने पावसानं रद्द झाले आहेत.