नेपाळ Cricket Match Ended in 9 Balls :क्रिकेटच्या मैदानातून दररोज काही ना काही धक्कादायक घटना समोर येत राहतात. सध्या, एक क्रिकेट सामना खूप लवकर संपल्यामुळं चर्चेत आहे. एका संघानं पाच षटकं फलंदाजी केली आणि विरोधी संघाला विजयासाठी 21 धावांचं लक्ष्य दिलं. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघानं फक्त 9 चेंडूत सामना जिंकला. डावाच्या दुसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर सामन्याचा निकाल लागला.
5-5 षटकांचा झाला सामना :वास्तविक भारताच्या शेजारील देश नेपाळमध्ये पंतप्रधान चषक महिला राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा सुरु आहे. ही स्पर्धा T20 स्वरुपात खेळवली जात आहे. तथापि, सुदूर पश्चिम प्रांत महिला आणि कर्नाली प्रांत महिला क्रिकेट संघांमधील सामना फक्त पाच षटकांचा खेळवण्यात आला. खराब हवामानानंतर, दोन्ही संघ फक्त पाच षटकांचा सामना खेळतील असा निर्णय घेण्यात आला. हा सामना नेपाळमधील फापला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आला. यात कर्नाळी महिला संघानं प्रथम फलंदाजी केली. त्यांना आपल्या धावसंख्येचा बचाव करता आला नाही, आणि त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.
सुदूर महिला संघानं 9 चेंडूत जिंकला सामना : या सामन्यात सुदूर महिला संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय योग्य ठरला. प्रथम गोलंदाजी करताना सुदूरनं कर्नालीला पाच षटकांत फक्त 20 धावा करु दिल्या. कर्नालीनं 5 षटकांत 7 विकेट्स गमावल्या आणि फक्त एक चौकार मारला. यात 7 पैकी 4 फलंदाजांना त्यांचं खातंही उघडता आलं नाही. कर्नालीच्या डावात कोणत्याही फलंदाजानं केलेली सर्वोच्च धावसंख्या फक्त 8 धावा होती जी श्रुतीनं केली. तर रामा बुधाथोकीनं 6 धावा केल्या. अंजू गुरुंग दोन धावांवर बाद झाली. सोविका शाही, दीक्षा पुरी, गौरी बोहरा आणि बिना थापा या चारही फलंदाजांना त्यांचं खातंही उघडता आले नाही. यापैकी दीक्षा आणि बीना या दोन फलंदाज पहिल्याच चेंडूवर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतल्या.
कबिता-आशिका जोडीची चांगली गोलंदाजी : या सामन्यात कविता कुंवर आणि आशिका महारा यांनी त्यांच्या गोलंदाजीनं कहर केला. कबितानं 2 षटकांत 1 मेडनसह फक्त 1 धाव देत दोन विकेट्स घेतल्या. तर आशिकानं दोन षटकांत 12 धावा देत तीन विकेट्स घेतल्या. रितू कनौजियानं एक विकेट घेतली. गोलंदाजीनंतर, कबितानं फलंदाजीही केली आणि 6 चेंडूत 14 धावा केल्या आणि मनीषा बोहरानं 5 धावांचे योगदान दिले. यासह 21 धावांचं लक्ष्य सुदूर संघानं नऊ चेंडूंमध्ये (1.3 षटकांत) गाठलं.
हेही वाचा :
- कांगारुंसमोर इंग्रजांचं 'पानिपत'... वनडे मालिकेत पाहुण्यांना क्लीन स्वीप
- मनू भाकर, डी. गुकेशला खेलरत्न तर मराठमोळ्या स्वप्नीलचाही राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान