चेन्नई IPL 2024 CSK vs SRH :ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज (CSK) पुन्हा एकदा इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या हंगामात विजयी मार्गावर परतलाय. चेन्नई संघानं सलग 2 पराभवानंतर विजयाची नोंद केली. रविवारी झालेल्या सामन्यात त्यांनी सनरायझर्स हैदराबादचा (SRH) 78 धावांनी पराभव केला. या विजयासह चेन्नई संघानं गुणतालिकेत मोठी झेप घेतलीय. या संघानं सहाव्या क्रमांकावरुन तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतलीय. चेन्नई संघानं आतापर्यंत 9 पैकी 5 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्सला पराभवानंतर मोठा फटका बसला आहे. हा संघ चौथ्या स्थानावर घसरलाय. सनरायझर्स संघानं आतापर्यंत 9 पैकी 5 सामने जिंकले आहेत.
हैदराबादचे फलंदाज अपयशी :चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना चेन्नईनं हैदराबादसमोर 213 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र, हैदराबादचा संघ 18.5 मध्ये केवळ 134 धावा करु शकला. त्यांनी सामना गमावला. सनरायझर्सकडून एडन मार्करमनं 32 आणि हेनरिक क्लासेननं 20 धावा केल्या. या दोघांशिवाय सनरायझर्स संघातील कोणालाही 20 धावांचा आकडाही गाठता आला नाही. वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेनं चेन्नई संघासाठी सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर मथिशा पाथिराना आणि मुस्तफिजुर रहमान यांनी 2-2 बळी मिळवले. शार्दुल ठाकूर आणि रवींद्र जडेजा यांनीही 1-1 विकेट मिळवली.